पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यात विघ्न नको म्हणून आंदोलन मागे!

नाशिक । प्रतिनिधी
मागील दोन दिवसांपासून नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि रवी राणा (Ravi Rana) यांनी ‘मातोश्री’ वर हनुमान चालीसा पठण करणार, यामुळे वातावरण तंग झाले होते. आक्रमक शिवसैनिकांनी (Shivsainik) राणा दाम्पत्यांना घराबाहेर पडणं मुश्किल केल्यानंतर आता अखेर रवी राणा यांनी आपलं आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करणार असल्याचे सांगितले. त्यानुसार आज ते मुंबईत हि पोहचले. मात्र मुंबईत शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. शिवसैनिकांनी राणा यांच्या घराजवळ जात घोषणा बाजी केली. अखेर राणा यांनी आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली.

मात्र नवनीत राणा यांनी सांगितले कि, ‘हे आंदोलन कुणाच्या दबावाखाली झुकून मागे घेत नसून उद्या (दि.२४) मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नियोजित दौरा (PM Narendra Modi Mumbai Visit) असल्याने कायदा व सुव्यवस्था बिघडू नये याकरिता मागे घेत असल्याचं त्यांनी जाहीर केले आहे.

काल अमरावती (Amravati) मधून राणा दाम्पत्य मुंबईत दाखल झाले. खार येथील त्यांच्या निवासस्थानी आले. पण ते मातोश्री या शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (CM Udhhav Thackeray) यांच्या घरी येणार हे समजताच शिवसैनिक आक्रमक झाले. शिवसेनेची महिला आघाडी, युवा सेना (Yuva Sena) आणि शिवसैनिक रस्त्यावर उतरले. त्यांनी मातोश्री बाहेर ठिय्या मांडला. आज सकाळीही नऊच्या सुमारास राणा दाम्पत्य राहत असलेल्या इमारतीच्या परिसरात शिवसैनिक घुसले. त्यानंतर पोलिसांनीही राणा दाम्पत्याला खाली न उतरण्याच्या सूचना केल्या.

दरम्यान राणा दाम्पत्याकडून शिवसैनिक गुंडागर्दी करत असल्याची आणि मुख्यमंत्र्यांनीच त्यांना आपल्यावर हल्ला करण्याचे निर्देश दिल्याचे आरोपही केले. उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांवर तेच गुन्हे दाखल व्हायला हवेत जे शरद पवार यांच्या घरावर आंदोलन केलेल्या लोकांवर दाखल केले आहेत, असं राणा म्हणाले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबईमध्ये त्यांना जाहीर झालेल्या लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार (Dinannath Mangeshakar Award) स्वीकारण्यासाठी येणार आहेत. हा पुरस्कार स्वीकारणारे ते पहिलेच मानकरी आहेत. सायनच्या षण्मुखानंद सभागृहामध्ये हा सोहळा पार पडणार आहे.