नाशिक । प्रतिनिधी
खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी पुन्हा एकदा दलित कार्ड चा प्लॅन वापरून आता खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर निशाणा साधला आहे. खासदार नवनीत राणा यांनी संजय राऊत यांच्यावर ॲट्रोसिटी (Atrocity Case) अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी तक्रार दिल्ली पोलिसांकडे केली आहे. या प्रकारामुळे हा वाद अधिक वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हनुमान चालिसावरून (Hanuman Chalisa) सुरु झालेला वाद, त्यानंतर राणा दाम्पत्याला झालेली अटक, अटक सत्रानंतर दलित असल्याने हीं वागणूक देत असल्याचा आरोप ते आता संजय राऊत यांनी केलेल्या आरोपावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. त्यामुळे सदर प्रकारामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
दरम्यान नवनीत राणा यांचा पोलिसांकडून मिळालेल्या आदराच्या वागणुकीचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर त्यांच्यावर चांगलेच ताशेरे ओढण्यात आले. त्यात खासदार संजय राऊत यांनी नवनीत राणा यांच्यावर अंडर वर्ल्डशी कनेक्शन असल्याचे सांगितले तसेच दाऊद इब्राहिम चा सहकारी युसूफ लकडावाला यांच्याकडून तब्बल ८० लाख रुपये कर्ज घेतल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे राणा यांच्यावर ईडीने (ED) कारवाई करावी, अशी सूचनाही त्यांनी यावेळी दिली.
याच प्रकरणावरून नवनीत राणा यांनी दिल्ली पोलिसांना पत्र लिहून संजय राऊत यांच्यावर ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा, तसेच “चांभार जातीची असल्यानं मला त्रास दिला जातोय, स्मशानात पुरण्याची धमकी दिली. बंटी बबली, ४२० म्हणून हिणवलं जातंय, त्यामुळे राऊतांविरोधात ॲट्रोसिटी कायद्याअंतर्गत कारवाई करावी अशी लेखी तक्रार त्यांनी दिल्ली पोलिसांकडे केली आहे.
दरम्यान नवनीत राणा यांच्या अडचणीत आणखीच वाढ होण्याची दाट शक्यता आहे. राणा यांच्या दाऊद कनेक्शनची चौकशी करण्याची मागणी महाविकास आघाडीकडून मुंबई पोलिसांच्या आर्थिक गु्न्हे अन्वेषण विभागाकडे (EOW) करण्यात येणार असल्याची माहिती आहे. नवनीत राणा यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या (Daud Ibrahim) जवळची व्यक्ती समजली जाणारी युसूफ लकडावालाकडून ८० लाखांचे कर्ज घेतले होते. या माहितीच्या आधारे मुंबई पोलिसांच्या EOW कडे चौकशी करण्यात येणार आहे.