मुंबई । प्रतिनिधी
करारापेक्षा कमी वीज पुरवठा करणाऱ्या अदानी कंपनीवर (Adani Company) करारभंगाची कारवाई करण्याचा इशारा ऊर्जामंत्री नितीन राऊत (Minister Nitin Raut) यांनी दिल्यानंतर अवघ्या २४ तासात अदानीने १ हजार ३११ मेगावॉटने वीज पुरवठा (Power Supply) वाढवला आहे. अदानी पॉवर कंपनीकडून शुक्रवारपासून १ हजार ७०० मेगावॉट वरून २ हजार २५० मेगावॉट वीज पुरवठा उपलब्ध होत असून आज मध्यरात्रीपासून एकूण ३ हजार ११ मेगावॉटपर्यंत वीजेची उपलब्धता होणार आहे. शिवाय महावितरणला (Mahavitaran) महानिर्मितीकडून (Mahanirmiti) अतिरिक्त ७०० मेगावॉट वीज मिळणार असल्याने भारनियमनाच्या (Power Shortage) संकटात किंचित दिलासा मिळाला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Udhhav Thackeray) यांनी काल, गुरुवारी ऊर्जा विभागाचा आढावा घेतला होता. या बैठकीत ठाकरे यांनी खासगी वीज कंपन्यांनी अतिरिक्त वीज निर्मिती करण्याची सूचना केली होती. तर करारानुसार वीज पुरवठा न करणाऱ्या कंपन्यांना करारभंगाची नोटीस देण्यात येणार असल्याचे राऊत यांनी म्हटले होते. या इशाऱ्याची दखल घेत अदानीने आजपासून वीज पुरवठा वाढवला आहे. विजेचे भारनियमन कमीत कमी करुन वीजग्राहकांना दिलासा देण्यासाठी महानिर्मिती आणि अदानीने महावितरणला अधिकची वीज उपलब्ध करुन देण्याची ग्वाही दिली आहे.
विजेच्या उपलब्धततेनुसार मागणी आणि पुरवठा यातील तूट कमी झाल्यास राज्यातील भारनियमन टप्प्याटप्प्याने कमी करण्यात येणार असून उन्हाच्या वाढत्या तापमानातील वीज संकटात नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे महावितरण कंपनीने आज प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
वाढते तापमान आणि विजेच्या वापरात झालेली वाढ यामुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबई (Mumbai) वगळता महावितरणच्या उर्वरित कार्यक्षेत्रात विजेची २४,५०० ते २५,००० मेगावॉट अशी अभूतपूर्व मागणी राहीली आहे. परंतु वीज खरेदीचा करार केलेल्या कंपन्यांकडून प्रामुख्याने कोळसा टंचाई तसेच इतर तांत्रिक कारणांमुळे वीज कमी मिळत असल्याने सुमारे २,३०० ते २,५०० मेगावॉट विजेची तूट निर्माण झाली होती. परिणामी राज्यात काही ठिकाणी भारनियमन सुरु करावे लागले आहे .
नितीन राऊत यांनी विजेची तूट भरून काढण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याचे आणि कोणत्याही परिस्थितीत राज्यात किमान भारनियमन व्हावे यासंदर्भात उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. विजेच्या तुटीची संभाव्य स्थिती पाहता महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी आपात्कालिन नियोजन केले. यातून महानिर्मिती आणि अदानी या दोन्ही वीज निर्मिती कंपन्यांनी अतिरिक्त वीज उपलब्धततेची ग्वाही महावितरणला दिली आहे. त्यामुळे ऐन उन्हाच्या तडाख्यात नागरिकांना वीज संकटातून दिलासा मिळणार आहे.