मुंबई । प्रतिनिधी
राज्यात सुरु असलेल्या भोंग्या आंदोलनासंदर्भात महत्वाची बातमी समोर आली आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांना ताब्यात घेताना शिवाजी पार्क परिसरामध्ये धक्काबुक्की झाल्याची घटना घडली आहे. यात एक महिला पोलिस अधिकारी पडल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी, राज्य सरकारने या प्रकाराची दखल घेतली आहे.
राज्यात आज मशिदीवरील अनधिकृत भोंगे उतरवण्याच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी आंदोलनं केली आहेत. दरम्यान काही भागात मौलवींनी सामंजस्याची भूमिका घेत भोंग्यांशिवायच अजान दिली तर काही ठिकाणी हनुमान चालिसा विरूद्ध अजान असा संघर्ष दिसला. मुंबईतही पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून काही प्रमुख नेत्यांना ताब्यात घेण्यास सुरूवात केली आहे.
दरम्यान मुंबईतीळ शिवाजी पार्क मध्ये झालेल्या घटनेननंतर संदीप देशपांडे पसार झाल्याची माहिती आहे. पोलिसांच्या कारवाईपासून वाचवण्यासाठी त्यांच्या हातावर तुरी देत पळून जाण्याचा हा प्रकार संदीप देशपांडे यांच्यासाठी अडचणीचा ठरण्याची शक्यता आहे. संदीप देशपांडे यांनी सरकारी कामामध्ये अडथळा आणल्याच्या प्रकारावरून आता गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी देखील ट्वीट करत याची माहिती दिली आहे. देसाई यांनी ‘मनसेचे नेते श्री. संदिप देशपांडे यांनी आज मुंबई पोलीस दलातील महिला अधिकारी यांचेशी केलेल्या गैरवर्तनाबद्दलची माहिती मी घेतली असून सदरच्या घडलेल्या गंभीर प्रकाराबद्दल तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांना दिले आहेत.’ असे स्पष्ट केले आहे.
पोलिसांकडून सध्या सीसीटीव्ही फूटेज, मीडीया फूटेज तपासून पाहिले जात आहे. त्यामधील पुराव्यांच्या आधारे संदीप देशपांडे यांच्यावर पुढील कारवाई होण्याची शक्यता आहे. संदीप देशपांडे यांच्यासोबत संतोष धुरी देखील होते. दोघेही मीडीयाशी बोलून पुढे जात गाडीमध्ये बसून पोलिसांना हुलकावणी देण्याच्या घाईगडबडीमध्ये हा सारा प्रकार घडला आहे.