औरंगाबादेत राज ठाकरेंची तोफ धडाडणार! पण…

मुंबई । प्रतिनिधी

राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ठाणे (Thane) येथील सभेत जाहीर केलेल्या ०१ मे रोजी औरंगाबाद (Aurangabad) येथे होणाऱ्या सभेसाठी मनसे जोरदार तयारी करत आहे.

दरम्यान, मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी मात्र ट्विटरवरुन मनसेच्या या सभेचा एक टीझर (Raj Thackeray Aurangabad Rally Teaser) पोस्ट केला आहे. या टीझरमध्ये औरंगाबाद शहराचा उल्लेख संभाजीनगर (Sambhajinagar) असा करण्यात आला आहे. एका बाजूला मनसेच्या सभेबाबत उत्सुकता असताना दुसऱ्या बाजूला मात्र औरंगाबाद पोलिसांनी सभेला अद्याप परवानगी दिली नाही.

शिवाजी पार्क (Shiwaji Park Ground Mumbai) येथील मैदानावर झालेल्या राज ठाकरे यांच्या सभेमुळे मनसेचा गुढीपाडवा मेळावा (Gudhipadwa Melava) चर्चेत राहिला. या सभेत राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्याबाबत भूमिका घेतली होती. राज यांनी केलेल्या भाषणाचे तीव्र पडसाद उमटले. मनसेतही पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली. अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. एकूणच गोंधळाचे वातावरण पाहून आठ दिवसांमध्ये मनसेने ठाणे येथे दुसऱ्या सभेचे आयोजन केले. या सभेला त्यांनी उत्तरसभा असे नावही दिले.

दुसऱ्या बाजूला राज ठाकरे यांच्या सभेला मराठवाड्यातील विविध संघटनांनी तीव्र विरोध केला आहे. प्रामुख्याने वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aaghadi), प्रहार संघटना, मौलांना आझाद विचार मंच, गब्बर ॲक्शन संघटना आणि ऑल इंडिया पँथर सेना (All India Panthar Sena) या पाच संघटनांनी राज यांच्या सभेला तीव्र विरोध करत पोलिसांनी सभेस परवानगी देऊ नये असे म्हटले आहे. दरम्यान, पोलिसांनी अद्याप तरी मनसेच्या सभेला परवानगी दिली नाही. उलट ०९ मे पर्यंत शहरात जमावबंदी लागू केलीआहे. त्यामुळे आता ही सभा होणार की नाही याबाबत उत्सुकता आहे.

दरम्यान पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांनी सांगितले की, औरंगाबाद पोलिसांनी केवळ मुंबई पोलिस ऍक्ट ३५ अन्वये आदेश जारी केला आहे. असा आदेश आम्ही वर्षभर काढत असतो. सण-उत्सवांदरम्यान कायदा-सुव्यवस्था बिघडू नये, तसेच विविध मिरवणुकींसाठी या आदेशानुसार आम्ही मार्ग सुचवत असतो. मात्र, ही नियमित चालणारी प्रक्रिया असते. या आदेशाचा अर्थ जमावबंदी लागू केली असा होत नाही, तसेच औरंगाबादेतील मराठा सांस्कृतिक मंडळात होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेला अद्याप परवानगी दिली नाही. त्याबाबत निर्णय होताच पोलिसांकडून अधिकृत माहिती दिली जाईल, असे निखिल गुप्ता यांनी स्पष्ट केले.