मुंबई । प्रतिनिधी
मनसेच्या गडकरी रंगायतन जवळ झालेल्या कालच्या उत्तरसभेत राज ठाकरें यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. त्यानंतर आज शरद पवार यांनी देखील ठाकरे यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
ठाणे येथे मनसेची उतररसभा काल पार पडली. या उत्तरसभेत राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधत शरद पवार यांना धारेवर धरले. पवार आपल्या भाषणात कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत नाहीत, असा आरोप ठाकरेंनी केला. त्या आरोपाला आज शरद पवारांनी पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले. राज ठाकरे पाच सहा महिन्यांत एकदा बोलतात त्यांच्याकडे लक्ष देण्याचं गरज नाही असं म्हटलं आहे. पण त्यांनी तीन चार महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख केल्याने त्याचं स्पष्टीकरण देत असल्याचे सांगत त्यांनी कॉंग्रेस-एनसीपीची युती ते जातीयवादाच्या मुद्द्यावरून केलेल्या टीकेला उत्तर दिलं आहे.
शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधत ठाकरेंचा समाचार घेतला. यावेळी म्हणाले कि, ‘राज ठाकरे वर्षा-सहा महिन्यात एखादं स्टेटमेंट करतात. त्यामुळे त्यांना फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही. ते म्हणतात की, मी कधीच शिवाजी महाराजांचे नाव घेत नाही. पण, दोन दिवसांपूर्वी मी अमरावतीमध्ये गेलो होतो. तुम्ही माझे अमरावीतचे भाषण ऐकू शकता. मी त्यात शिवाजी महाराजांचे योगदान, यावर पंचवीस मिनीटे बोललो.’ तर आस्तिक की नास्तिक आहे, यावर बोलताना ‘आपण प्रचाराचा नारळ बारामतीमध्ये एकाच देवळात करतो, पण त्याचा गाजावाजा करत नाही, असं म्हटलं आहे.
ते पुढे म्हणाले पण काही आदर्श आहे, त्यामध्ये प्रबोधन ठाकरेंचं लेखन प्रभावित करते. राज ठाकरेंनी ते वाचावं असा सल्ला त्यांना दिला आहे. सोबतच महाराष्ट्राला फुले, आंबेडकरांचा वारसा आहे, याचा मला अभिमान आहे आणि तो शिवरायांचाच विचार आहे. दरम्यान आपण पुरंदरेंच्या लेखणाच्या विरोधात असण्यावर ठाम असल्याचाही पुनरूच्चार केला आहे.
शिवरायांवर जिजाऊ यांचे संस्कार आहेत. पुरंदरेंच्या लिखाणात त्यांच्यावर दादोजी कोंडदेव यांनी शिवरायांना घडवलं असं म्हटलं आहे. त्यामुळे पुरेंदरांवर टीका करणार्यांचा मला अभिमान आहे असं त्यांनी म्हटलं आहे. शाहू,फुले, आंबेडकर यांना महाराजांबद्दल खूप आस्था होती. महाराजांचा आदर्श घेऊन सत्तेचा वापर कसा करावा, याचा विचार तिन्ही पक्षांनी केला आणि त्यातूनच महाराजांच्या विचाराची मांडणी करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.