By चैतन्य गायकवाड
गेल्या दहा पंधरा दिवसांपासून राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला होता. शिवसेनेचे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडामुळे सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार कोसळले. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर अतिशय नाट्यमयरित्या एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. एकनाथ शिंदे यांना भाजपने पाठिंबा दिला आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले.
त्यातच आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी (West Bengal CM Mamata Banarji) यांनी आरोप केला आहे. महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी बंडखोर आमदारांना पैशाशिवाय आणखी काय देण्यात आलं, असा गौप्यस्फोट ममता बॅनर्जी यांनी केला आहे. तसेच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार बेकायदा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या सरकारने सत्ता मिळवली असली, तरी महाराष्ट्राचे मन आणि हृदय त्यांना जिंकता आलेली नाही, अशी टीका देखील ममता बॅनर्जी यांनी केली
महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना पैशांशिवाय आणखीही काही देण्यात आले, असा गौप्यस्फोट तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची इंडियाटुडे कॉन्क्लेव्ह ईस्टमध्ये मुलाखत झाली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर स्पष्टपणे भाष्य केले.
शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी आसाममधील हॉटेलमध्ये लक्झरी लाइफ एन्जॉय केली. त्यासाठी पैसा कोठून आला? या बंडखोर आमदारांना केवळ पैसाच पुरविला गेला नाही तर आणखीही बरेच काही दिले गेले आहे. या सर्वगोष्टी कोठून आल्या? असा खडा सवाल ममता बॅनर्जी यांनी केला. ‘आणखीही काही’ म्हणजे काय? हे सांगू शकाल का? असा प्रश्न विचारला असता ममता बॅनर्जी म्हणाल्या, मला माहित आहे भाजप काय करू शकते आणि काय नाही, मला काय म्हणायचे आहे, ते सर्वांना समजले आहे.
सरकार लवकरच कोसळेल
शिंदे सरकार सहा महिन्यात कोसळू शकते. त्यामुळे मध्यावधी निवडणुकीची शक्यता असल्याचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP chief Sharad Pawar) यांनी रविवारी म्हटले होते. तेच आज ममता बॅनर्जी यांनीही शिंदे–फडणवीस सरकार लवकरच कोसळेल असे सांगितले. सत्ता मिळवली पण महाराष्ट्राचे मन जिंकलेले नाही. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकार बेकायदा आहे.