अहमदनगर : राज्य महिला आयोगाच्या (State Women Commission) अध्यक्षा (Chairperson) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्या रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. भाऊसाहेब रामदास शिंदे असे धमकी देणाऱ्या संशयिताचे नाव आहे. या व्यक्तीने रुपाली चाकणकर यांना पुढील २४ तासांत जीवे मारू, अशी धमकी दिली होती. संशयित भाऊसाहेब रामदास शिंदे हा नेवासा (Nevasa) तालुक्यातील आहे. त्याला अहमदनगर पोलिसांनी (Police) अटक केली आहे. रुपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी देणारा व्यक्ती हा अहमदनगर मधील असल्याची माहिती मिळताच अहमदनगर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली होती.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांना जीवे मारण्याची धमकी आली होती. राष्ट्रीय महिला आयोगाच्या नवी दिल्लीच्या कार्यालयात हा धमकीचा फोन आला होता. एका अज्ञात व्यक्तीने फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. पुढच्या २४ तासांत रुपाली चाकणकर यांना जीवे मारू, असा धमकीचा फोन काल (दि.३०) दुपारच्या सुमारास महिला आयोगाच्या कार्यालयात आला होता. या धमकीच्या फोनमुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, रुपाली चाकणकर यांना या अगोदरही दोन वेळा धमकीचा फोन आला होता. तुमचा कार्यक्रम करू, अशी अर्वाच्च भाषा धमकी देणाऱ्या व्यक्तीने वापरली होती. तर एका व्यक्तीने रुपाली चाकणकर यांचे पुण्यातील (Pune) सिंहगड रोडवरील धायरी येथील कार्यालय पेटवून देण्याची धमकीही दिली होती.
कोण आहेत रुपाली चाकणकर ….. रुपाली चाकणकर या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून कार्यरत आहेत. याअगोदर त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यरत होत्या. जुलै २०१९ मध्ये त्यांनी महिला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी घेतली होती. मार्च २०२२ मध्ये त्यांनी या पदाचा राजीनामा दिला. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तत्कालीन महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर रुपाली चाकणकर यांच्याकडे महिला प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे देण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी धडाडीने काम केले. त्याचे बक्षीस म्हणून त्यांना राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद देण्यात आले.