मन हेलावणारे! पत्नीला कार शिकवताना नियंत्रण सुटले..कार विहिरीत

by : ऋतिक गणकवार

बुलढाण्यात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. शाळेला सुट्टी होती म्हणून पत्नीला चारचाकी शिकवत होते, पत्नीचे वाहनावरून नियंत्रण सुटले आणि चारचाकी वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या ७० फुट विहिरीत कोसळले. या धक्कादायक घटनेत पत्‍नी व मुलीचा मृत्‍यू झाला आहे. ही घटना देऊळगावराजा येथील चिखली रोडवर घडली आहे. घटनेने परिसरात खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पती कसाबसा वाचला असून त्यांना दवाखान्‍यात दाखल करण्यात आले आहे.

घटनेची अधिक माहिती अशी की, देऊळगावराजा येथील रामनगरमध्ये राहणारे शिक्षक अमोल मुरकुट हे पत्नी स्वाती मुरकुटला कार शिकवत होते. त्यांच्यासोबत त्यांची मुलगी सिद्धी मुरकुट ही सुद्धा सोबत होती. दरम्यान कार शिकवित असताना चिखली रोडवर जात असताना कार वरील ताबा सुटला. यानंतर कार सरळ 70 फुट खोल विहिरीमध्ये पडली.

या दुर्दैवी घटनेत स्वाती मुरकुट व मुलगी सिद्धी मुरकुट यांचा मात्र पाण्यामध्ये मृत्यू झाला आहे. अमोल मुरकुट खिडकीमधून कसेबसे बाहेर आले. यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. ही घटना मन हेलावून टाकणारी होती असून संपूर्ण पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेत एकाच कुटुंबातील दोघांवर काळाने घाला घातला आहे.

स्वाती मुरकुट व सिद्धी यांचा मृतदेह शोधण्यात येत असून अग्निशमन गाडी, पोलीस ताफा घटनास्थळी दाखल झाले आहेत. अद्याप त्यांचा पत्ता लागला नसून यंत्रणा युद्धपातळीवर त्यांचे मृतदेह शोधत आहेत. घटनास्थळी मोठी गर्दी जमल्याचे चित्र आहे.