नाशिक : प्रेम संबंध ठेवले नाही तर जीवे मारण्याची धमकी देत एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना सिडकोत घडली आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात विनयभंगासह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध ( पोक्सो ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय पवार असे संशयिताचे नाव आहे. पीडित मुलगी शनिवारी शिवशक्ती चौकातून पायी जात असताना संशयिताने तिचा रस्ता अडवत हे कृत्य केले. माझ्याशी प्रेम संबंध ठेव नाहीतर तुमचा बेत पाहतो ,अशी धमकी देत त्याने मुलीचा विनयभंग केला. यावेळी मुलीने घरी जाऊन आपल्या आईकडे घडलेला प्रकार कथन केल्याने त्यांनी पोलिसात धाव घेतली आहे.
उघड्या घरातून मोबाईल चोरी
उघड्या घरातून मोबाईल चोरून नेल्याची घटना जुने नाशिक परिसरातील काजी गढी येथे घडली आहे . याप्रकरणी सागर हनुमान सूर्यवंशी राहणार कुंभारवाडा अमरधाम रोड यांनी दिलेल्या तक्रारीवरून भद्रकाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . सूर्यवंशी कुटुंबीय बुधवारी घरात असताना ही घटना घडली आहे .अज्ञात चोरट्याने उघड्या घरात प्रवेश करत चार्जिंगला लावलेले सुमारे 31 हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल चोरून नेले आहे.
चाकूचा धाक दाखवत मोबाईल लांबविला
वरदळीचे ठिकाण असलेल्या मेन रोड भागात तरुणाला चाकूचा धाक दाखवत दोघा भामट्यांनी खिशातील मोबाईल बळजबरीने काढून घेत पोबारा केल्याची घटना घडली आहे . याप्रकरणी राहुल विनायक पगारे (वय १९ ,रा. चाचडगाव, ता . दिंडोरी ) या युवकाने भद्रकाली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . राहुल पगारे हा कामानिमित्त शहरात आला असता रात्री मेन रोड परिसरातील गाडगे महाराज पुतळा भागातील लाल वाईन्सच्या पाठीमागील बोळीतून पाय जात असताना ही घटना घडली.