By चैतन्य गायकवाड |
भारतीय महिला क्रिकेटवर (Women Cricket) तसेच जागतिक पातळीवर आपल्या कर्तृत्वाने अधिराज्य गाजवणारी, दीर्घकाळ महिला क्रिकेटवर ‘राज’ करणाऱ्या मिताली राज (Mithali Raj) हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेट (International Cricket) मधून निवृत्तीची (Retirement) घोषणा केली आहे. मिताली हिने आपल्या ट्विटर अकाउंटवरून (twitter account) ट्विट (tweet) करून ही माहिती दिली आहे. तिच्या या घोषणेने तमाम क्रिकेट प्रेमींना धक्का बसला आहे. तिने तब्बल 23 वर्ष्यांच्या यशस्वी कारकिर्दीला विराम देत, सर्वांनी दिलेले प्रेम आणि पाठिंबा यासाठी आभार मानले. मितालीने ट्विट करून एक संदेश जारी केला. या संदेशाच्या सुरुवातीलाच तिने म्हटलं आहे की, “वर्षानुवर्षे तुम्ही सर्वांनी दिलेल्या प्रेम आणि पाठिंब्यासाठी धन्यवाद! तुमच्या आशीर्वादाने आणि पाठिंब्याने मी माझ्या आयुष्यातील दुसऱ्या डावाची सुरुवात करत आहे.”
३९ वर्ष्याच्या मिताली राजने आज ट्विटरवर एक संदेश जारी करून निवृत्तीची घोषणा केली. मितालीने तिच्या संदेशात लिहिले आहे की, “मी एक लहान मुलगी म्हणून निळी जर्सी परिधान करून प्रवासाला निघाले. कारण आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणे हा सर्वोच्च सन्मान आहे. प्रत्येक घटनेने मला काहीतरी वेगळे शिकवले. गेली 23 वर्षे माझ्या आयुष्यातील सर्वात परिपूर्ण, आव्हानात्मक आणि आनंददायक वर्षे आहेत. इतर सर्व प्रवासांप्रमाणे हा प्रवासही संपला पाहिजे. आज मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्ती घेत आहे.”
बीसीसीआयने (BCCI) दिलेल्या पाठिंब्यासाठी आभार व्यक्त करताना ती म्हणाली की, “प्रथम एक खेळाडू म्हणून आणि नंतर भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार म्हणून मला मिळालेल्या पाठींब्याबद्दल मी बीसीसीआय आणि श्री जय शाह (मानद सचिव, बीसीसीआय) यांचे आभार मानू इच्छिते.” यावर बीसीसीआयने देखील ट्विट करून मिताली राज हिला शुभेच्छा देताना म्हटले आहे की, “भारतीय क्रिकेट मध्ये तुमचे योगदान अभूतपूर्व आहे. मिताली राज हिचे अप्रतिम कारकिर्दीबद्दल अभिनंदन! तुमच्या दुसऱ्या इनिंगसाठी आम्ही तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो!”
मितालीने यावर्षी न्यूझीलंडमध्ये झालेल्या महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत शेवटचा सामना खेळला होता. तिने स्पर्धेतील सात सामन्यांत २६ च्या सरासरीने आणि ६२.९७ च्या स्ट्राईक रेटने १८२ धावा केल्या. मात्र, ती टीम इंडियाला विजेतेपद मिळवून देऊ शकली नाही. मितालीने आपला शेवटचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता.