“..तर आम्ही मातोश्रीवर परत जाऊ”- संजय राठोड यांची भूमिका

By चैतन्य गायकवाड

यवतमाळ : शिवसेना (Shivsena) नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाजपच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात शिंदे सरकारने बहुमत सिद्ध केले. त्यानंतर शिवसेनेतील बंडखोर आमदार आपल्या मतदारसंघात परतत आहे. यातीलच एक आमदार संजय राठोड (Sanjay Rathod) शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर पहिल्यांदाच यवतमाळला आले. त्यानंतर संजय राठोड यांनी बोलताना एक महत्त्वाची भूमिका मांडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही ४० आमदारांनी घेतलेली भूमिका बंड नव्हे तर उठाव होता. तसेच ‘मातोश्री’चे दरवाजे सन्मानाने आमच्यासाठी उघडले, तर आम्ही सर्वजण परत जाऊ, असे खळबळजनक विधान आमदार संजय राठोड यांनी केले.

शिवसेनेचे यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील दिग्रस विधानसभा (Digras Constituency) मतदारसंघाचे आमदार संजय राठोड (MLA Sanjay Rathod) हे आपल्या मतदारसंघात परतले आहे. संजय राठोड पुढे म्हणाले की, “पक्षातील उठावानंतर सर्वांचाच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ‘मातोश्री’वर परत येण्याचा विचार सुरू होता. मात्र काही व्यक्तींच्या अनावश्यक बडबडीमुळे ते शक्य झाले नाही.” असा आरोपही राठोड यांनी खासदार संजय राऊत यांचे नाव न घेता केला.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराकाडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच बंडखोर आमदार आता त्यांच्या मतदार संघात जाऊन डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आमदार संजय राठोड यांनी त्यांच्या मतदार संघात जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधत आपली बाजू स्पष्ट केली. संजय राठोड पुढे म्हणाले की, “पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच आमचे नेते असून, माझ्या कार्यालयात आणि घरात त्यांचाच फोटो आहे. तसेच मातोश्रीकडून मला बोलवण्यात आले, तर मी पुन्हा जाईल.”

बंडखोरी केल्यानंतर आमदार संजय राठोड यांच्या विरोधात यवतमाळ जिल्ह्यात मोठे विरोध प्रदर्शन झाले होते. शिवसैनिक त्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरले होते. दरम्यान, राठोड हे त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात पोहचले. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांची संवाद सांधला. आपण ही भूमिका का घेतली, याचे स्पष्टीकरणही देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. राठोड यांनी संजय राऊत यांना लक्ष करत, त्यांच्यामुळेच ही वेळ आल्याचे सांगितले.