मनसे आक्रमक; सफाई कर्मचाऱ्यांसह उपोषणाला सुरुवात

नाशिक : ‘वॉटरग्रेस प्रोडक्ट्स’ (Water grace) कंपनीतील कर्मचाऱ्यांना न्याय मिळण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आमरण उपोषणाची हाक दिली होती. त्यानुसार आज नाशिक महानगरपालिके (Nashik NMC) समोर तब्बल ३०० ते ४०० कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांच्या (Workers Hunger Strike) उपस्थितीत आमरण उपोषण करण्यात आले आहे. मनसेच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु झाले होते. मोठ्या संख्येने कर्मचारी आणि मनसैनिक या ठिकाणी उपस्थित होते.

नाशिक महानगरपालिकेतील शहर स्वच्छतेचे कंत्राट असलेल्या वॉटर ग्रेस प्रोडक्ट्स कंपनीने काढल्याने उपासमारीचे संकट ओढवलेल्या ४५० ते ५०० सफाई कामगारांना सनदशीर मार्गाने न्याय मिळवून देण्यासाठी आज (दिनांक २० फेब्रुवारी) सकाळी नऊ वाजेपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी सफाई कामगार आणि त्यांचे कुटुंबीय नाशिक महानगरपालिकेच्या दारावर आमरण उपोषणास हजार होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला होता.

वॉटर ग्रेस कंपनीने कामावरून अचानक काढून टाकल्याने कर्मचारी आक्रमक झाले आहेत. अचानक कामावरून कडून टाकल्याने बेरोजगारी आणि उपासमारीचे संकट कामगारांवर ओढवले आहे. नाशिक मनपाने वॉटर ग्रेस या कंपनीला शहरातील साफसफाईचा ठेका दिला होता. मात्र कंपनी तर्फे ऐन दिवाळीच्या वेळेला कामगारांना कामावरून काढून टाकण्यात आले. त्यामुळे कामगार संतापले आहेत. गेल्या चार महिन्यांपासून कामगार वेळोवेळी या विरुद्ध आवाज उठवत आहे.

आज नाशिक महानगर पालिकेसमोर मनसे शहर अध्यक्ष दिलीप दातीर यांच्या नेतृत्वाखाली उपोषणाला सुरुवात करण्यात आली. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण करणार असल्याचा ठाम निश्चय यावेळी करण्यात आला आहे. पुन्हा कामावर रुजू करून घ्यावे ही कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे. त्यामुळे आता मनपा प्रशासन यावर काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागून आहे.

वाटरग्रेस कंपनी कडून अचानक केलेल्या या कारवाईमुळे मनसेने आक्रमक पवित्र घेतला आहे. मनसेने या कामगारांना पाठींबा देत त्यांच्या संदर्भात अनेक वेळा निवेदन देऊ न्याय देण्याची मागणी केली होती. ‘चार महिन्यांपूर्वी कामगारांना अवैधपणे वाटरग्रेस या कंपनी ने ४५० ते ५०० सफाई कामगारांना कामावरून काढून टाकले होते. त्याविरीधात आवाज उठवण्यात आला. मुख्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांना चार चार वेळा निवेदन देण्यात आले. मात्र प्रशासनाला जाग येत नाहीये. त्यामुळे अखेर उपोषणाचा मार्ग स्वीकारला असून कामगारांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण थांबणार नाही’ असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी म्हंटले आहे.