महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप यांच्यावरील हल्लाप्रकरणी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुंबईच्या भांडूप भागातून या दोन जणांना अटक करण्यात आली आहे. घटना घडल्यानंतर पोलिसांनी वेगाने तपास केला. तपासासाठी विशेष पथकाची देखील नेमणूक करण्यात आली होती. त्यानंतर अखेर दोन जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावर शुक्रवारी (दि. ३) सकाळी दादरमधील शिवाजी पार्कमध्ये ३ अज्ञात इसमांनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात संदीप देशपांडे यांच्या हातापायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना हिंदुजा
रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करीत परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे.
या फुटेजमधील देशपांडेंवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांची छायाचित्रे आणि सीसीटीव्ही फुटेज हाती लागली असल्याची माहिती आहे. देशपांडे यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात वर्णन केल्यानुसार तिन्ही हल्लेखोरांची छायाचित्रे जशीच्या तशी जुळताना दिसत असल्याचे देखील वृत्त समोर आले आहे.
दरम्यान, काल संदीप देशपांडे सकाळी सव्वा सातच्या सुमारास मॉर्निंग वॉकला छत्रपती शिवाजी महाराज मैदानात अर्थात शिवाजी पार्क याठिकाणी गेले होते. यावेळी अचानक ४ अज्ञात इसमांनी त्यांना क्रिकेट बॅट आणि स्टम्पने मारहाण करण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे संदीप देशपांडे जखमी होऊन खाली कोसळले. हा प्रकार लक्षात येताच मैदानातील काही लोकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला असता हल्लेखोरांनी पळ काढला.
हल्लेखोरांनी चेहऱ्यावर रुमाल बांधला होता. हल्ल्यानंतर त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. देशपांडे यांच्यावरील हल्ल्याचे वृत्त समजताच मनसेप्रमुख राज ठाकरे, अमित ठाकरे, भाजप आमदार नितेश राणे, शिवसेना
आमदार सदा सरवणकर यांनी रुग्णालयात भेटून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली, तर पोलिसांनी देशपांडे यांच्या राहत्या घरी जाऊन त्यांचा जबाब नोंदवला.
या जबाबानंतर पोलिसांनी ३०७, ५०४, ५०६ (२) भादंविसह क्रिमिनल अॅमेंडमेंट अॅक्ट ७ अन्वये गुन्हा
दाखल केला आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि काही संशयितांना ताब्यात घेऊन चौकशीही सुरू केली आहे. या सर्व प्रकरणात मनसे नेते अमेय खोपकर यांनी थेट आदित्य ठाकरे यांच्याकडे अंगुलीनिर्देश केले आहे. तर संदीप देशपांडे यांनी देखील पोलिसांना दिलेल्या जबाबात संजय राऊत आणि वरून सरदेसाई यांचे नाव घेतल्याची माहिती समोर येत आहे.
आदित्य ठाकरे यांनी आमच्यावर आरोप करत प्रसिद्धी मिळवण्याचा हा प्रकार असल्याचे म्हणत उपरोधिक टोला लगावला आहे.