मनसे नेते संदीप देशपांडे यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाकडून मंजूर..

मुंबई : मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि संदीप धुरी यांना मुंबई सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. या दोघांना सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. पण यासोबातच दर महिन्याच्या १ आणि २३ तारखेला पोलिस स्टेशन मध्ये हजेरी लावण्याची अट यात घालण्यात आली आहे. तसेच देशपांडे यांचा चालक रोहित वैश्य यांना देखील जामीन देण्यात आला आहे.

मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि संदीप धुरी गेल्या अनेक दिवसांपासून फरार होते. त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने अटकेची टांगती तलवार होती.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसे कार्यकर्त्यांनी भोंग्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांनतर राज्यातील शांतता व्यवस्थित राखण्यासाठी पोलिसांनी मनसेच्या अनेक पदाधिकारी वा कार्यकर्त्यांना अटक केली होती. पोलिसांनी राज ठाकरे यांच्या घराजवळ मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना पकडण्याचा प्रयत्न केला होता. पण दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी अचानक झालेल्या राड्यात एक महिला पोलिस जखमी झाल्या होत्या. यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. घटनेच्या दिवसापासून हे दोन्ही नेते फरार होते. मुंबई पोलिस त्यांचा शोध घेत होते. मात्र, देशपांडे यांच्या चालकाला अटक करण्यात आली होती.

या साऱ्या प्रकरणावर देशपांडे यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला होता. संदीप देशपांडे आणि संदीप धुरी यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला असून त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.