By चैतन्य गायकवाड
देशात यावर्षी महागाई दर वाढलेला आहे. संपूर्ण राज्यातील तसेच देशातील जनता महागाईने होरपळून निघत असतानाच, आता महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने (Maharashtra State Electricity Regulatory Commission) वीज दरवाढ करण्याची (electricity price hike) घोषणा केली आहे. वीज कंपन्यांना वीज बिलातून इंधन समायोजन आकार म्हणजेच FAC वसूल करण्याबाबत मंजुरी दिल्याने, आता ग्राहकांना वीज दरवाढीचा फटका बसणार आहे. कोळसा आणि इंधनाचे दर वाढल्यानंतर महावितरण इंधन समायोजन आकारामध्ये वाढ करत असते. त्यामुळे आता एलपीजी सिलेंडर, सीएनजी गॅस, पेट्रोल-डिझेल यासारख्या वस्तूंमध्ये दरवाढीनंतर आता ग्राहकांना वीज दरवाढ देखील सहन करावे लागणार आहे.
अशी होणार वीज दरात वाढ…
० ते १०० युनिट – आधी १० पैसे, आता ६५ पैसे
१०१ ते ३०० युनिट – आधी २० पैसे, आता एक रुपया ४५ पैसे
३०१ ते ५०० युनिट – आधी २५ पैसे, आता दोन रुपये ५ पैसे
५०१ युनिटच्यावर – आधी २५ पैसे आता दोन रुपये ३५ पैसे
कशी होणार वीज बिलात वाढ (१५ ते १६ टक्के वाढ)…
समजा उदाहरण म्हणून, जर तुम्हाला पाचशे रुपये वीज बिल येत असेल, तर आता त्यात जवळपास ८० रुपये वाढ होऊन हे बिल ५८० पर्यंत जाणार आहे. समजा तुम्हाला एक हजार रुपयांचे वीज बिल येत असेल, तर त्यात वाढ होऊन आता ते वीज बिल १२०० रुपये पर्यंत जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान महावितरणने दिलेल्या माहितीनुसार, जून महिन्याच्या बिलात ही वाढ लागू होईल. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या चार महिन्यात वीज खरेदीवर झालेला खर्च भरून काढण्यासाठी वीजबिलात ही दरवाढ केल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे अदानी इलेक्ट्रिसिटीच्या वीज ग्राहकांना प्रति युनिट सरासरी 92 पैसे वाढ होणार आहे. तर टाटा पॉवर वीज ग्राहकांना प्रति युनिट एक रुपये पाच पैसे वाढ होणार आहे. दरम्यान, राज्यात मार्च आणि एप्रिल महिन्यात विजेचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला होता. विजेची मागणी देखील मोठ्या प्रमाणावर वाढली होती. त्यामुळे या कालावधीत वीज खरेदी करण्यात आली होती. वीज खरेदी वाढल्याने इंधन समायोजन कर वाढवण्यात आला आहे. इंधन समायोजन कर हा प्रत्येक कंपनीसाठी वेगळ्या पद्धतीने आकारला जातो.