झुणका भाकर केंद्राच्या अतिक्रमणावर महापालिकेचा हातोडा

सातपूर । प्रतिनिधी
अनेक वर्षांपासून सातपूर आयटीआय सिग्नल जवळ सुरू असलेले झुणका भाकर केंद्र वर महापालिका अतिक्रमण विभागाने कारवाई करत अतिक्रमित हॉटेल जमीनदोस्त केले.

युती सरकारच्या पहिल्या कार्यकाळात गरीब जनतेला पोटभर जेवण अल्प दारात मिळावे या उद्देशाने राज्यात ठीक ठिकाणी झुणका भाकर केंद्र सुरू करण्यात आले होते. त्या अंतर्गत आययी्राय सिग्नल येथे आयटीआय बसस्थानकाला लागून झूणका भाकर केंद्र सूरू करण्यात आले होते. झुणका भाकर योजना बंद होऊनही बराच कालावधी उलटला होता. झूणका भाकर बंदही झाले होते. मात्र केंद्र चालकाने त्याठिकाणी स्वतःचे हॉटेल थाटण्यासोबतच त्याच ठिकाणी निवासस्थान देखील थाटले होते.

मनपाचा कार्यभार स्विकारताच नूतन मनपा आयुक्तांनी अतिक्रमणावर विशेष लक्ष केंद्रीत केले असल्याने तसेच याबाबत नूतन मनपा आयुक्त यांच्याकडे तक्रार दाखल झाल्याने अतिक्रमण विरोधी पथकाने हे अतिक्रमण उध्वस्त केले.