नाशिक: महापालिकेने शहरातील नळजोडणीधारकांकडून पाणीपट्टी देयक सहजरित्या व वेळेत प्राप्त व्हावे यासाठी आणि पाणी पट्टी देयक भरणे नळजोडणी धारकांनाही सोपे जावे यासाठी एक ‘ॲप’ तयार केले आहे. पण जवळपास दोन ते अडीच लाख नळधारक असताना हे ॲप फक्त दोनशे ते सव्वादोनशे लोकांनीच इंस्टोल केले आहे. व त्याचा वापर करत आहेत. महापालिकेचा हा डिजिटल उपक्रम फसला आहे. या ॲप’ चा प्रचार व प्रसार करण्यासाठी पालिकाच मागे पडली आहे. त्यामुळे आता या ‘ॲप’ चा प्रचार व प्रसार करण्यासाठी महापालिकेकडून विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे.
महापालिकेकडे आधीच मनुष्यबळ अपुरे पडते त्यामुळे पाणी पट्टी वसूल करणे कठीण जाते. एकाचवेळी देयकांची गर्दी होते त्यामुळे देयक गोळा होण्यास खूप वेळाही लागतो, आणि नळजोडणीधारक देयक भरण्यास हलगर्जीपणा करतात. पाणी पट्टीचे देयक मुदतीत मिळवीत व देयक ऑनलाईन मिळवीत यासठी पालिकेने ॲप चा उपक्रम राबवला होता. पण गेली एक दीड महिन्यापासून या ॲपचा वापर जेमतेम दोनशे ते सव्वा दोनशेच लोकांकडूनच होत आहे. आणि विशेष म्हणजे त्यात ७५ टक्के महापालिकेचेच कर्मचारी आहेत.
महापालिकेकडे सव्वादोन लाख नळजोडणीधारक आहे. त्यात पाणीपट्टी थकबाकी सव्वाशे कोटींवर गेली आहे. पाणीपुरवठ्यावर होणारा खर्च आणि पाणीपट्टीतून मिळणारा महसूल यात खूप फरक आहे. याबाबतीत महापालिका आधीच तोट्यात आहे, दरवर्षी महापालिकेला यामुळे मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागतो. म्हणून पाणीपट्टी देयक ही ऑनलाईन प्रकारे स्वीकारली तर मुदतीच्या आधी ग्राहक देयक भरतील यासाठी महापालिकेने हे स्वतंत्र ‘ॲप’ विकसित केले होते.
नागरिक पाणी मीटरचा फोटो काढून ॲपद्वारे महापालिकेला पाठवू शकतील, रीडिंग प्राप्त झाल्यानंतर पाणीपट्टी विभागाचे कर्मचारी योग्य-अयोग्यता तपासून नागरिकांना याबाबतचे निर्देश देणार आहेत. संबंधित बिलाची रक्कम निश्चीत होऊन ग्राहकाला इ-मेल किंवा व्हाट्सॲपद्वारे बिल पाठवले जाईल त्यानंतर ग्राहकांना हे बिल भारता येणार आहे.
‘गुगल प्ले स्टोअर’ वरून नागरिकांनी हे ॲप डाऊनलोड करावे असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.