By चैतन्य गायकवाड |
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून शहरात गुन्हेगारी (crime) घटना वाढल्या आहे. शहरात अवघ्या १८ दिवसांत ८ हत्या घडल्या आहेत. तसेच गुन्हेगारी घटनांमध्ये खून (murder), अपहरण (kidnapping), मारहाण, घरफोडी तसेच चेन स्नॅचिंग (chain snaching) अश्या अनेक गंभीर घटना आहेत. त्याअनुषंगाने गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी नाशिक शहर पोलिसांकडून (Nashik city police) विशेष झडतीसत्र मोहीम राबविण्यात येत आहे. नाशिक शहर पोलिसांकडून मंगळवारी (दि. ७) रात्री उशिरापर्यंत विशेष मोहीम राबविण्यात आली. पोलिस आयुक्तालयाच्या परिमंडळ-१ मधील सात पोलिस ठाण्यांच्या हद्दीत झडतीसत्र मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान शहर पोलिसांनी पायी पेट्रोलिंग (petroling) करत, ५७ टवाळखोरांवर तसेच तडीपार गुंड व रेकॉर्डवरील गुन्हेगारांवरही कारवाई केली. रात्री उशिरापर्यंत चौकाचौकात बसून टवाळी करण्याऱ्या तरुणांवर कारवाई करण्यात आली. या मोहिमेत विनापरवानगी शहरात येणाऱ्या ३ तडीपार गुंडांची कसून तपासणी करण्यात आली. तसेच अवैध (illegally) हत्यार प्रतिबंधक कारवाईनुसार चार व्यक्तींवर कारवाई करण्यात आली. या विशेष मोहिमेत विविध कारवायांतर्गत तब्बल १९६ जणांवर कारवाई करण्यात आली.
शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी विशेष झडतीसत्र मोहीम राबवली. नाशिक शहर पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे (Nashik Police Commissioner Jayant Naiknavare) यांच्या आदेशाने परिमंडळ-१ हद्दीतील पंचवटी (Panchavti), आडगाव (Adgaon), म्हसरूळ (Mhasarul), भद्रकाली (Bhadrakali), सरकारवाडा (Sarakarvada), गंगापूर (Gangapur) आणि मुबईनाका (Mubainaka) या सात पोलिस ठाण्यांचे प्रत्येकी एक असे सात पथके तयार करण्यात आली. या प्रत्येक पथकात एक पोलिस अधिकारी, पाच पुरुष अंमलदार व दोन महिला अंमलदार यांचा समावेश होता. रात्री 8 ते 11 व मध्यरात्री 1 ते पहाटे 4 वाजेपर्यंत ही विशेष मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेत अनेक टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली. या झडतीसत्रात पायी गस्त घालणे, कोम्बिंग ऑपरेशन, गुन्हेगारांची तपासणी, हत्यार प्रतिबंधक कारवाई, काही गुन्ह्यांमध्ये संशयित असलेले आरोपींची चाचपणी, पोलिस रेकॉर्ड वरील संशयित गुन्हेगारांची तपासणी, तडीपार करण्यात आलेल्या गुंडांची तपासणी अश्या अनेक कारवाया करण्यात आल्या.
पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्या आदेशाने व परिमंडळ-१ चे पोलिस उपायुक्त अमोल तांबे, विभाग १ चे सहाय्यक पोलिस आयुक्त गंगाधर सोनावणे, विभाग २ च्या सहाय्यक पोलिस आयुक्त दिपाली खन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. सातही पोलिस ठाण्यांचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांच्या नेतृत्वात प्रत्येक पोलिस स्थानक हद्दीत स्वतंत्र पथक स्थापन करून धडक कारवाई करण्यात आली.
अशी करण्यात आली कारवाई… अवैध हत्यार प्रतिबंधक कारवाई- ४, रेकॉर्डवरील आरोपी तपासणी- ४२, हिस्ट्रीसीटर तपासणी- २४, पाहिजे असलेले आरोपी तपासणी- १२, सर्व्हेलन्स आरोपी तपासणी- 20, तडीपार आरोपी तपासणी- १९, टवाळखोर कारवाई- ५७, वेळेत दुकान बंद न करणे- १, संशयास्पद फिरणारे- ३, विनापरवानगी शहरात येणारे तडीपार- ३, आरोपी तपासणी- १०.