अखेर बालभारतीचे मद्यपी व्यस्थापक डामसे निलंबित

नाशिक । प्रतिनिधी

कर्तव्यावर कार्यरत असताना कार्यालयातच मद्यपान करण्याचा ठपका ठेवत बालभारतीचे भांडार व्यवस्थापक लक्ष्मण डामसे यांना बालभारतीच्या संचालक मंडळाकडून निलंबित करण्यात आले असून त्यांची खात्यांतर्गत चौकशी सुरू करण्यात आली आहे. याबाबतची माहिती संचालक मंडळाकडून देण्यात आली आहे.

सिडकोतील लेखा नगर येथील बालभारतीच्या विभागीय पाठ्यपुस्तक वितरण भांडारचे व्यवस्थापक लक्ष्मण डामसे हे त्यांच्या कार्यालयातील वरच्या खोलीमध्ये मद्यधुंद अवस्थेत असल्याचे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उघडकीस आणले. याबाबतची माहिती शिवसेनेचे सागर देशमुख व विभाग प्रमुख निलेश साळुंखे यांनी अंबड पोलिसांना दिली. यानंतर अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल होत डामसे यांना म्हणजे प्राशन करीत असताना ताब्यात घेतले.

त्यानंतर त्यांनी मद्यप्राशन केले की नाही याबाबतची अधिकृत नोंद करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांची जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात आली. या वैद्यकीय चाचणी नमुना न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आला असून या चाचणीचा अहवाल अद्याप पोलिस व चौकशी समितीला प्राप्त झाले नाही मात्र संचालक मंडळाकडून डामसे यांना निलंबित करण्यात आले आहे.

मात्र डामसे यांनी मद्यपान केले होते का? याबाबतचा अहवाल अद्याप न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेकडून पोलिसांना प्राप्त झाला नसल्याने पोलिसांना व चौकशी समितीला ही पुढील तपासासाठी या अहवालाची प्रतीक्षा आहे.