नाशिकमध्ये सीएनजी दरात पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढ..

By चैतन्य गायकवाड |

नाशिक : नाशिककरांसाठी मोठी बातमी असून, नाशिक शहरात (Nashik city) सीएनजीचे दर (CNG rate) मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सीएनजीचे दर प्रतिकिलो २ रुपयांनी (per kg 2 rs. hike) वाढवण्यात आले आहे. त्यामुळे आता नाशिककरांना एक किलो सीएनजीसाठी ९१.९० रुपये मोजावे लागणार आहे. याअगोदर ८९.९० रुपये प्रतिकिलो मिळणारा सीएनजी आता तब्बल प्रतिकिलो ९१.९० रुपयांवर पोहचला आहे. दरम्यान, शहरात सीएनजी दरात सातत्याने वाढ होत आहे.

यावर्षी महागाईच्या प्रश्नाने सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. सातत्याने जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ होत आहे. किराणा, खाद्यतेल तसेच घरगुती वापराच्या एलपीजी (LPG) सिलेंडरचेही दर मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दुसरीकडे पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे नागरिक हैराण आहेत. त्यातच आता सीएनजी दर वाढीची भर पडली आहे. यामुळे सीएनजी वाहन चालकांना मोठा धक्का बसला आहे. नाशिकमध्ये सीएनजीच्या दरात प्रतिकिलो २ रुपये इतकी वाढ झाली आहे. हे नवे दर मध्यरात्री (midnight) पासून लागू करण्यात आले आहे. त्यामुळे सीएनजी वाहन धारकांनाही आता अधिकचे पैसे मोजावे लागणार आहे.

महिन्याभरात तिसऱ्यांदा दर वाढ… मागील वेळी दि. ३१ मे रोजी सीएनजी दरात वाढ करण्यात आली होती. त्यावेळी प्रतिकिलो ३ रुपये ९० पैशे इतकी वाढ करण्यात आली होती. या दर वाढीमुळे ८६ रुपये प्रतिकिलो मिळणारा सीएनजी ८९.९० रुपयांवर गेला होता. आता ८९.९० रुपये प्रतिकिलो मिळणाऱ्या सीएनजीच्या (CNG) दरात (price) २ रुपये वाढ होऊन ९१.९० रुपये प्रतिकिलो पर्यंत दर पोहचले आहे. दरम्यान, याही अगोदर दि. २१ मे रोजी सीएनजी दरात वाढ झाली होती. त्यावेळी प्रतिकिलो ३ रुपये वाढ करण्यात आली होती. त्यानंतर नवीन दर प्रतिकिलो ८६ रुपये इतके झाले होते. नाशिकमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून सीएनजीचे दर प्रतिकिलो तब्बल २०.९० रुपयांनी वाढले आहे. एप्रिलच्या (April) पहिल्या आठवड्यात नाशिकमध्ये सीएनजीचे दर प्रतिकिलो ७१ रुपये एवढे होते. आता हेच दर ९१.९० रुपयांवर पोहचले आहे. पुन्हा एकदा भाववाढ झाल्याने नागरिकांच्या खिशाला मोठ्या प्रमाणात झळ बसणार आहे. सातत्याने सीएनजी दरात वाढ होत असल्याने सीएनजी वाहन चालकांमध्ये नाराजी दिसून येत आहे.