सरकारवाडा पोलिसांची विशेष कामगिरी! तासाभरात मोठी रक्कम शोधली.

By चैतन्य गायकवाड :

नाशिक : सरकारवाडा पोलिसांनी (Sakarvada Police) उल्लेखनीय कामगिरी करत, अवघ्या तासाभरात पोलिसांनी थोडेथोडके नाही तर तब्बल ६ लाख ६८ हजार रुपयांची रक्कम शोधली आहे. एवढी मोठी हरवलेली रक्कम नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांनी तासाभरात तपासाची चक्रे फिरवून तक्रारदार यांना परत केली आहे. या उल्लेखनीय कामगिरीने सरकारवाडा पोलिसांचे सर्व स्थरातून विशेष कौतुक होत आहे.

या घटनेबद्दल अधिक माहिती अशी की, चार्टर्ड अकाऊंटंट (Chartered Accountant) उल्हास भोसले आणि चार्टर्ड अकाऊंटंट जयेश देसले यांच्या ऑफिस मधील सहाय्यक गणेशचंद्र पिंगळे यांना ऑफिसमध्ये जमा झालेली रोख रक्कम सीबीएस येथील जळगाव जनता बँकेत भरण्यासाठी सांगण्यात आले होते. त्याआधी ते ‘रामायण’ बंगल्यासमोर चार्टर्ड अकाऊंटंट तुषार पगार यांच्या ऑफिसमधून चेक घेण्यासाठी थांबले होते. तुषार पगार यांच्या ऑफिस मधून चेक घेऊन गणेशचंद्र पिंगळे यांनी रोख रक्कम असलेल्या बॅगमध्ये सदर चेक ठेवला. मात्र, ते घाईगडबडीत बॅगची चैन लावण्याचे विसरून गेले. ह्या अनावधानाने झालेल्या चुकीने गणेशचंद्र दुचाकीवरून जात असताना, त्या बॅगेत ठेवलेली तब्बल 6 लाख 68 हजार रुपयांची रोकड खाली पडली. ही रक्कम लाल रंगाच्या बॅगमध्ये ठेवलेली होती. त्या बॅगसह रक्कम खाली पडली. ही बाब लक्षात येताच, पिंगळे यांनी पैसे असलेल्या पिशवीचा बराच शोध घेतला. मात्र खूप वेळ शोध घेऊनही ही पिशवी न सापडल्याने पिंगळे यांनी तत्काळ सरकारवाडा पोलिस स्थानकात तक्रार देण्यासाठी आले.

त्यानंतर, सी. ए. उल्हास भोसले, सी. ए. जयेश देसले आणि गणेशचंद्र पिंगळे यांनी या घटनेबद्दल सरकारवाडा पोलिस स्थानकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक साजन सोनवणे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन माहिती दिली. त्यानंतर साजन सोनवणे यांच्या आदेशाने गुन्हे शोध पथकाने तत्काळ तपासाची चक्रे फिरवली. पिंगळे यांनी कामानिमित्त ज्या मार्गावरून मोटार सायकल नेली, त्या मार्गावर शोध सुरु केला. पोलिसांनी या मार्गावरील परिसरात असलेले सर्व सीसीटीव्ही तपासले. सीसीटीव्ही मध्ये ही लाल रंगाची बॅग रामायण बंगल्यासमोर पडलेली असल्याचे व एक व्यक्ती ती उचलून घेऊन जात असल्याचे दिसून आले. पोलिसांनी या व्यक्तीची माहिती घेऊन त्याचा शोध घेत, चौकशी केली. त्यानंतर त्या व्यक्तीने सर्व रक्कम पोलिसांकडे सुपूर्द केली. सरकारवाडा पोलिसानी अवघ्या तासाभरात या घटनेचा छडा लावल्याने, त्यांच्या कामगिरीचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे.

पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे, परिमंडळ-१ चे पोलिस उपायुक्त अमोल तांबे, विभाग २ च्या सहाय्यक पोलिस आयुक्त दिपाली खन्ना, सरकारवाडा पोलिस स्थानकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही उल्लेखनीय कामगिरी पार पाडण्यात आली. सरकारवाडा पोलिस स्थानकाचे गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक मच्छिंद्र कोल्हे, पोलिस नाईक संतोष लोंढे, पोलिस शिपाई रविंद्र लिलके, पोलिस शिपाई योगेश वायकंडे, पोलिस शिपाई परबत, पोलिस शिपाई ससाणे आणि पोलिस शिपाई रोहन कहांडळ यांनी ही उल्लेखनीय कामगिरी पार पाडली.