नाशिक | प्रतिनिधी
जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून आर्थिक डबघाईमुळे गेल्या १० वर्षांपासून बंद असलेला नाशिक सहकारी साखर कारखाना (Sugar Factory) नूतनीकरण कार्यक्रम संपन्न झाला आहे.
दरम्यान २०१२ पासून पळसे येथे असलेला हा कारखाना बंद होता. त्यामुळे कारखान्याची मालमत्ता जिल्हा बँकेच्या ताब्यात होती. म्हणून हा कारखाना भाडेतत्वावर सुरू करून दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी (Farmers) केली होती. दरम्यान हा सारासार विचार करत नाशिक येथील प्रख्यात बिल्डर दीपक चंदे यांच्या दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स संस्थेने चालवायला घेतला आहे.
त्यानुसार शनिवारी नाशिक सहकरी साखर कारखाना नूतनीकरण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ, खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. दरम्यान कारखाना सुरू होणार असल्याने नाशिक मधील ऊस उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला असून पुढच्या काही महिन्यात कारखाना प्रत्यक्षात सुरू होणार आहे.
गेले दहा वर्ष कारखाना बंद असल्याने जिल्ह्यातील ऊस उत्पादक, शेतकऱ्यांना मोठा फटका बसत होता. अखेर कारखाना सुरू होणार असल्याने जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी आनंदात आहे.