छंद पडला महागात, तिघे पोलिसांच्या ताब्यात

By चैतन्य गायकवाड |

नाशिक : शहरातील जुने नाशिक (old nashik) परिसरात गुन्हे शाखा युनिट १ (crime branch unit 1) ने धडक कारवाई करत, ७ तलवारी जप्त केल्या आहे. तीन संशयित आरोपींकडून एकूण ७ तलवारी जप्त करण्यात आल्या आहे. या संशयित आरोपींना ताब्यात घेऊन अधिक तपासासाठी भद्रकाली पोलिसांच्या (Bhadrakali Police) ताब्यात देण्यात आले आहे. अवैधरीत्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी या तीन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

https://youtu.be/PKrTQ7wYsgk

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट १ मध्ये कार्यरत असलेले पोलिस अंमलदार रात्री पेट्रोलिंग (petroling) करत असताना पोलिस नाईक विशाल देवरे (Police Naik Vishal Devre) यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली. शितलादेवी चौक, काजी गडी, अमरधाम रोड या परिसरात राहणाऱ्या काही व्यक्तींकडे धारदार तलवारी असल्याची गुप्त माहिती पोलिस नाईक विशाल देवरे यांना मिळाली. विपुल अनिल मोरे (वय २८), गणेश राजेंद्र वाकलकर (वय २२), चेतन रमेश गंगवानी (वय २६) (तिघेही रा. जुने नाशिक) अशी संशयित आरोपींची नवे आहे. या तिघांनी कुठून तरी धारदार तलवारी आणून, घरात लपून ठेवले आहे, अशी खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. या तीनही व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेऊन विपुल मोरे याच्याकडून ४ तलवारी, गणेश वाकलकर याच्याकडून २ तलवारी, चेतन रमेश गंगवणी याच्याकडून १ तलवार अश्या एकूण ७ तलवारी जप्त करण्यात आल्या आहे.

पोलिसांनी या तिघांची चौकशी केली असता, या तिघांनी छंद म्हणून घरी ठेवण्याकरिता उज्जैन येथून एकसाथ तलवारी विकत आणल्याचे सांगितले. या तिन्ही व्यक्तींविरोधात गुन्ह्याचा कोणताही पूर्व इतिहास नाही. दरम्यान, या तीनही आरोपींना जप्त तलवारीसह भद्रकाली पोलीस स्टेशनच्या ताब्यात भारतीय हत्यार कायदा ४/२५ प्रमाणे कारवाईसाठी देण्यात आले आहे.