By चैतन्य गायकवाड |
नाशिक : ‘फादर्स डे’ च्या दिवशी तलवारीने केक कापणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले असून, पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. या संशयित आरोपीला पंचवटी पोलिसांनी (Panchavati Police) ताब्यात घेतेले. त्या आरोपीकडून पंचनामा करून ती तलवार जप्त करण्यात आली आहे. या संशयित आरोपी विरोधात पंचवटी पोलीस स्टेशन येथे भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ व म. पो. कायदा १३५ या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक मधील पोलीस अंमलदार महेश साळुंके (Mahesh Salunke) यांना गस्तीवर असताना एक गुप्त माहिती मिळाली. संशयित आरोपी ‘फादर्स डे’ च्या दिवशी कुठून तरी बेकायदेशीर तलवार आणून तलवारीने केक कापून ‘फादर्स डे’ साजरा करणार असल्याची खात्रीशीर माहिती व फोटो या अंमलदारांना मिळाले. तसेच ही तलवार या संशयित आरोपीने घरामध्ये लपवून ठेवलेली असल्याची माहितीदेखील त्यांना मिळाली होती. त्यांनी ही माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ (PI Vijay Dhamal) यांना कळवली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी विष्णू उगले, पोलीस अंमलदार सुरेश माळोदे, प्रदीप म्हसदे, संदीप भांड, आसिफ तांबोळी, नाझीमखान पठाण, प्रशांत मरकड, महेश साळुंके, अण्णासाहेब गुंजाळ यांच्या पथकाने मिळालेल्या माहितीप्रमाणे फुलेनगर येथे धडक कारवाई केली.
शांताराम देवराम गुरगुडे (वय ४४, राहणार घर नं. जी जी १२, फुलेनगर, पंचवटी) असे या संशयित आरोपीचे नाव आहे. या आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडे बेकायदेशीररित्या तलवार आहे का, अशी विचारपूस करण्यात आली. या संशयित आरोपीने बेकायदेशीररित्या तलवार असल्याचे कबूल केले. तसेच त्याने घरात पलंगाखाली लपवून ठेवलेली तलवार काढून पोलीसांकडे सुपूर्द केली. या संशयित आरोपींच्या घरात बेकायदेशीररीत्या धारदार तलवार मिळून आल्याने सदरची तलवार पंचनामा करून जप्त करण्यात आली. या संशयित आरोपीला पुढील कारवाईकरिता पंचवटी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.