By चैतन्य गायकवाड
नाशिक : एटीएममध्ये (ATM) पैसे काढण्यासाठी गेलेल्या व्यक्तीची एका अनोळखी व्यक्तीने हातचलाखीने एटीएम कार्डची (ATM card) अदलाबदल करून फसवणूक केल्याची घटना द्वारका (Dwaraka) येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) एटीएममध्ये घडली होती. भद्रकाली पोलिसांनी (Bhadrakali Police) एटीएममध्ये असलेल्या सीसीटीव्हीच्या (cctv) माध्यमातून आरोपीचा शोध लावून अटक केली आहे.
नाशिक (Nashik) शहरातील द्वारका येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मशीनमध्ये एक व्यक्ती पैसे काढण्यासाठी गेली असता, एका अनोळखी इसमाने फिर्यादी व्यक्तीला एटीएम कार्डचे नवीन पिनकोड (Pincode) जनरेट (generate) करण्यास मदत करतो, असे सांगितले. त्यानंतर आरोपीने फिर्यादी यांची नजर चुकवून त्यांच्या एटीएम कार्डची अदलाबदल करून घेतली. तसेच फिर्यादीच्या बॅंक खात्यातील (Bank account) २३,१००/- रूपये काढुन घेऊन सदर रक्कमेचा अपहार केला. ही बाब फिर्यादीला लक्षात आली असता त्यांनी भद्रकाली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला. त्याअनुषंगाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, आरोपीचे फुटेज मध्ये दिसणारे वर्णन व आरोपीची गुन्हा करण्याची पध्दत यावरून पोलिस नाईक विशाल काठे यांनी काढलेल्या माहितीवरून पोलीस पथकाने कौशल्यपुर्ण पध्दतीने गुन्हयातील आरोपीला ताब्यात घेतले.
वरिदर बिलबहादुर कौशल (वय- ४२ वर्षे रा. जेलरोड, नाशिकरोड) अशी आरोपीची माहिती आहे. आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसोशीने तपास केला असता त्याने गुन्हा केल्याची कबुली (confession) दिली. आरोपीला न्यायालयात सादर केले असता, न्यायालयाने त्यास ०८ जून पर्यंत पोलिस कोठडी (Police custody) सुनावली आहे.आरोपींकडून गुन्हयातील अपहार केलेली २३,१०० रू. येवढी रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.
या गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक (API) ज्ञानेश्वर मोहिते (Dnyaneshwar Mohite) हे करत आहेत.