By चैतन्य गायकवाड |
नाशिकरोड : नाशिकरोड (Nashikroad) परिसरात हाणामारीच्या दोन घटना घडल्या आहेत. या दोन्ही घटनेत हल्लेखोरांनी शस्रांनी (weapons) हल्ला केला आहे. पहिल्या घटनेत बुधवारी (दि. ८) रात्री दहा वाजेच्या सुमारास चार कोयताधारी हल्लेखोरांनी रुग्णवाहिकेच्या (ambulance) डॉक्टरवर (doctor) हल्ला करून जखमी केले. या हल्ल्यात डॉक्टरांच्या हाताला जखम झाली आहे. तसेच खिश्यातील रक्कम घेऊन हल्लेखोर दुचाकींवरून फरार झाले. तर दुसऱ्या घटनेत एका व्यक्तीच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना मारहाण केली. तसेच घरातील साहित्याची तोडफोड करत दुचाकी जाळण्याचा प्रयत्न केला. हल्लेखोरांच्या हातात कोयते व तलवारी असल्याची माहिती मिळाली आहे.
रुग्णवाहिकेच्या डॉक्टरवर हल्ला … नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात (Bytco hospital) डॉ. ओंकार पाटील हे राज्य शासनाच्या आपत्कालीन वैद्यकीय मदत (emergency medical help) पुरवणाऱ्या १०८ या रुग्णवाहिकेवर कार्यरत आहे. डॉ. ओंकार पाटील हे मोबाईलवर बोलत असताना दोन दुचाकींवर चौघे हल्लेखोर आले. या चौघा हल्लेखोरांनी त्यांच्या हातातील मोबाईल हिसकून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर एका हल्लेखोराने कोयता काढून त्यांच्या हातावर वार केला. इतर तिघा हल्लेखोरांनी त्यांचे हात धरून ठेवत खिशात असलेली तीन ते साडेतीन हजारांची रक्कम काढून घेतली. यानंतर डॉक्टरांनी आरडओरड करताच रुग्णालयातील कर्मचारी धावत आले. मात्र, तितक्यात हल्लेखोर दुचाकींवरून पळून गेले.
एका हल्लेखोराने कोयत्याने केलेल्या हल्ल्यात डॉ. पाटील यांच्या हाताला जखम झाली. त्यांना त्वरित रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच नाशिकरोड पोलिसांनी (Nashikroad Police) घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पाटील यांच्याकडून हल्लेखोर व त्यांच्याजवळ असलेल्या दुचाकींचे वर्णन जाणून घेत तत्काळ वायरलेस यंत्रणेला माहिती दिली. पोलिस रात्री उशिरापर्यंत हल्लेखोरांचा शोध घेत होते.
घरात घुसून एका व्यक्तीला जबर मारहाण … दुसऱ्या घटनेत नाशिकरोड येथील दीपक पाईकराव या व्यक्तीच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना जबर मारहाण केली. तसेच त्यांच्या घरातील साहित्याची तोडफोड केली. घराबाहेर उभी असलेली त्यांची दुचाकी जाळण्याचाही प्रयत्न केला. या हल्लेखोरांच्या हातात कोयते तसेच तलवारी असल्याची माहिती मिळाली आहे. हे शस्त्रे घेऊन हल्लेखोर घरात घुसले. हल्लेखोरांनी केलेल्या या मारहाणीत दीपक पाईकराव हे जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या हल्लेचे कारण अद्याप समोर आलेले नाही.