नाशिक : शहरातील उंटवाडी (Untwadi) परिसरातून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची घटना घडली आहे. उंटवाडी येथील बालकल्याण समिती कार्यालयातून एका अज्ञात व्यक्तीने एका अल्पवयीन मुलीला फुस लावून पळून नेल्याचा संशय तक्रारदार यांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात (Mumbai Naka Police Station) अज्ञात संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई नाका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला या सदर अल्पवयीन मुलीस बालकल्याण समिती समक्ष (उंटवाडी) येथे हजर करण्यासाठी ताब्यात घेऊन, हजर करण्याकरिता कार्यालयाच्या रजिस्टरला नोंद घेत होत्या. त्यादरम्यान ही मुलगी तक्रारदार यांची नजर चुकवून पळून गेली. या मुलीला कुणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा तक्रारदार यांचा संशय आहे. पोलीस उपनिरीक्षक शेळके या घटनेचा अधिक तपास करत आहे.
दरम्यान शहरात मोटरसायकल चोरीचे सत्र सुरूच असून, पुन्हा एकदा शहरातून तीन मोटरसायकल चोरी झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
गंगापूर पोलीस स्थानक
गंगापूर पोलीस स्थानकात (Gangapur Police Station) दाखल केलेल्या तक्रारीनुसार, तक्रारदार सागर भालेराव पाटील (रा. एस. टी. कॉलनी, गंगापूर रोड) यांची मोटर सायकल चोरी झाली आहे. सागर पाटील राहत असलेल्या ठिकाणाहून बिल्डिंगच्या खाली दुकानाच्या समोर पार्किंग केलेली होंडा कंपनीची शाईन ही गाडी (एम. एच. १८, बी.बी. ३१२८) चोरीला गेली आहे. पोलीस नाईक मोरे या घटनेचा अधिक तपास करत आहे.
सातपूर पोलीस स्थानक
सातपूर पोलीस स्थानकात (Satpur Police Station) दाखल केलेल्या तक्रारीनुसार, तक्रारदार प्रदीप कारभारी अहिरे (रा. राधाकृष्ण नगर, अशोक नगर, सातपूर) यांची मोटर सायकल चोरी झाली आहे. सातपूर येथील महिंद्रा कंपनीच्या पार्किंगमधून काळ्या रंगाची होंडा शाईन (एम. एच १५, ए. के. ४७४७) चोरीला गेली आहे. पोलीस हवालदार सुर्यवंशी या घटनेचा अधिक तपास करत आहे.
उपनगर पोलीस स्थानक
उपनगर पोलीस स्थानकात (Upnagar Police Station) दाखल केलेल्या तक्रारीनुसार, प्रांजल सतिश चंद्रमोरे (रा. धनराज नगर, दुर्गामाता मंदिर, जेलरोड) यांची मोटर सायकल चोरीला गेली आहे. धनराज नगर, जेलरोड या परिसरातून बजाज कंपनीची पल्सर (एम. एच. १५ ई. टी. ००५४) चोरीला गेली आहे. पोलीस नाईक कोल्हे या घटनेचा अधिक तपास करत आहेत.