नाशिक । प्रतिनिधी
नाशिकमधील सातपूर अंबड लिंक रोडवर भंगार माल व स्टील विक्री करणाऱ्या एकाच कुटुंबातील तीन बड्या व्यवसायिकांनी बनावट कागदपत्रांद्वारे वीस कोटींचा आयटीसी मिळवत शासनाची फसवणूक केली असून हा महाघोटाळा तब्बल शंभर कोटी पर्यंत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
नाशिकमधील अंबड लिंकरोड येथील भंगार मार्केट राज्यात सर्वश्रुत आहेत. येथील भंगार बाजारात लाखोंची उलाढाल होत असते. काही वर्षापूर्वी मनपाने भंगार बाजार अनधिकृत ठरवून भंगार बाजारावर हातोडा चालविला होता. मात्र आता भंगार बाजार पुन्हा जोमाने उभा राहिला आहे. येथील लाखो करोडोंची उलाढाल बाहेरून येणाऱ्या तसेच स्थानिक व्यापाऱ्यांना नेहमीच मालामाल करणारी असते. अशातच येथील तीन व्यापाऱ्यांनी मिळून १०० कोटींचा घोटाळा केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे येथील भंगार बाजार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
दरम्यान या तीन व्यापाऱ्यांनी एकत्र येत हा घोटाळा केल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे कामगारांना माहिती नसताना त्यांच्याच नावावर बनावट कंपन्या दाखवून कागदावर सुमारे २०० हून अधिक व्यवसाय दाखवून त्यापोटी सुमारे वीस कोटींचा जीएसटी इंपुत टॅक्स क्रेदित पदरात पाडून घेण्यात आला असल्याची माहिती तपासणी पथकातील सूत्रांनी व्यक्त केली आहे.
केंद्रीय व राज्य जीएसटीच्या नाशिक आयुक्तालयाने हा घोटाळा उघडकीस आणला असून तिघांना चौकशीसाठी समन्स बजावले असता त्यांनी चौकशी टाळून अटक टाळण्यासाठी थेट न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. सातपूर अंबड लिंक रोडवरील संजीव नगर मधील महाराष्ट्र स्टील ट्रेडर्सचे अजय मुल्ला नईम चौधरी, हिरा स्टीलचे हफिजुलला चौधरी आणि गौरी इस्पातचे अताऊल्ला चौधरी या तिघांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. तिघांनीही कॅनव्हासवर इनपुट टॅक्स क्रेडीटचा बेकायदेशीरपणे लाभ घेत असल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले होते.
दरम्यान दोन्ही कंपन्यांनी दाखल केलेल्या जीएसटी रिटर्न नुसार प्रत्यक्षात जागेवर काहीच स्टाल्स नसल्याचे दिसून आले. त्यांच्या दोन्ही फॉर्मची जीएसटी नोंदणी २५ मार्च पासून रद्द करण्यात आली आहे..सीजीएसटी कायदा २०१७ व सुधारित २०२२ तरतुदीनुसार नुसार संशयितांनी शासनाची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे सदर व्यावसायिकांना लवकरच अटक होण्याची शक्यता असून इतक्या कोटींचा घोटाळा उघडकीस आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.