नाशिक । प्रतिनिधी
नाशिकमध्ये गुन्ह्याचे सत्र वाढतच असून गुरुवारी रात्री एबीबी सर्कल जवळील उत्कर्षनगरमध्ये एकाची धारदार शस्राने खून करण्याची आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
‘मुलींना मोबाईल का दाखवतो, इथून निघून जा, असे सांगितले, याचा राग मनात धरत शुल्लक कारणावरून संशयित गौरव जाधव याने रमेश नारायण ताठे (रा. उत्कर्षनगर) यास धारदार शस्त्राने त्रंबक रोडवरील एबीबी सर्कल जवळील उत्कर्ष नगरमध्ये भोसकले चाकूचा वर्मी घाव छातीच्या डाव्या बाजूला लागल्याने रमेश साठे यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास ताठे यांनी संशयिताचा भाऊ अजिंक्य जाधव यास हटकले होते. त्याचा राग मनात धरून कुरापत काढून गौरव जाधव यांनी गुरुवारी मध्यरात्री दीड ते पावणे दोनच्या सुमारास वाद घालत शिवीगाळ केली. यावेळी उत्कर्ष नगरमध्ये उभारलेल्या माणसाजवळ धारदार चाकूने रमेश साठे यांच्यावर हल्ला चढवला.
दरम्यान अचानकपणे झालेल्या घटनेने एकच धावपळ उडाली. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख हे तात्काळ पोलिसांच्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. घटनेची माहिती जाणून घेत घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करत जिल्हा रुग्णालय गाठले. या प्रकरणी मनीष काशिनाथ रूपवते वैद्य यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गंगापूर पोलिसांनी जाधव विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास गंगापूर पोलिस करत आहेत.