नाशिक | प्रतिनिधी
मुंबई नाका येथील उड्डाणपुलावर (Mumbai Naka flyover) एका प्रवाश्यास रिक्षाचालकाने (Auto Driver) लुटल्याची घटना समोर आली होती, मात्र सदर तक्रारदार प्रवाशानेच हा बनाव रचल्याचा धक्कादायक प्रकार पोलिस तपासात उघड झाला आहे. मद्याची व गांज्याची सवय आई वडीलांना कळेल, म्हणूण तक्रारदारानेच हा बनाव केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, सदर प्रवाशी रिक्षात बसला असताना रिक्षा चालकासह त्याच्या तीन मित्रांनी बेदम मारहाण करीत रोकड व नवीन मोबाइल हिसकावून नेल्याची घटना मुंबई नाका पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील उड्डाणपुलावर शनिवारी रात्री समोर आली हाेती. याप्रकरणी मुंबई भांडुप याठिकाणी राहणारे अभिनेष जगन्नाथ गुप्ता याने मुंबईनाका पोलिस ठाण्यात (Mumbai Naka police) अज्ञात चार जणांविराेधात जबरी चोरीची फिर्याद दाखल केली हाेती.
दरम्यान, मुंबई नाका पाेलिसांनी गुन्हा दाखल हाेताच तपास सुरु केला. त्यात तक्रारदार गुप्ता हा नशेत असल्याने पाेलिसांना माहिती मिळवण्यात व तपासात अडचणी आल्या. गुप्ता याने पूर्वी दिलेली माहिती व नशा उतरल्यानंतर दिलेल्या माहिती यात पोलिसांना तफावत आढळली.
तसेच गुप्ताच्या खिशात १२०० रुपये राेख सापडले असून पाेलिस यासंदर्भात सखाेल तपास करत आहे . तसेच गुप्ताच्या अंगावर मारहाणीच्या जखमा देखील आढळून आल्या नसल्याचे समाेर आले आहे. सध्या फिर्यादी गुप्तावर जिल्हा रुग्णालयात (Nashik Civil Hospital) उपचार सुरू आहे.