आडगाव परिसरात हुंडाबळी.. सासरच्या त्रासामुळे विवाहितेची आत्महत्या..

By चैतन्य गायकवाड |

आडगाव : आडगाव पोलिस स्थानक (Adgaon Police Station) हद्दीतील नांदूरनाका (Nandurnaka) परिसरातील निसर्गनगर येथे राहणाऱ्या एका विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या (Suicide) केल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. सासरच्या मंडळींनी विवाहित महिलेकडे सतत माहेरून १ लाख रुपये आणण्यासाठी तगादा लावला. तसेच लग्नात १ लाख रुपये हुंडा (dowry) न दिल्याच्या कारणावरून विवाहितेला मानसिक व शारीरिक त्रास दिला. त्यामुळे या त्रासाला कंटाळून, विवाहितेने आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे.

या घटनेबाबत मृत विवाहितेच्या आईने मुलीच्या सासरच्या मंडळींविरुद्ध आडगाव पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली. या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत विवाहिता सोनाली हिचे दिनांक १४ फेब्रुवारी २०२० रोजी लग्न झाले. लग्न झाल्याच्या ३ महिन्यांनंतर सोनालीला सासरच्या मंडळींनी तिच्या आई-वडिलांनी लग्नात १ लाख रुपये हुंडा दिला नाही म्हणून, त्रास देण्यास सुरुवात केली. दिनांक ०७ जून २०२२ पर्यंत सासरच्या मंडळींनी सोनालीला सतत शारीरिक व मानसिक त्रास दिला. या सततच्या त्रासाला कंटाळून सोनालीने आत्महत्या केली आहे.

ही घटना मंगळवारी (दि. ७ जून) रोजी घडली. विवाहितेला हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक छळ करून त्रास दिल्याबद्दल, तसेच तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल सासरच्या मंडळींविरुद्ध आडगाव पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिषेक कांतिलाल देवकर, अनिता कांतिलाल देवकर, संतोष कांतिलाल देवकर (सर्व रा. कांबळे गल्ली, निसर्ग नगर, नांदूर नाका) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांनी सोनालीला तुझ्या आई-वडिलांनी लग्नात भांडे, सोन्याची अंगठी आणि घर बांधण्यासाठी व व्यवसायासाठी १ लाख रुपये हुंडा दिला नाही म्हणून नेहमी त्रास दिला. तसेच सासरचे लोक या कारणावरून तिच्याशी नेहमी भांडणाची कुरापत काढून, तिला शिवीगाळ करून मारहाण करायचे. तिचा मानसिक व शारीरिक छळ करून, माहेरून १ लाख रुपये घेऊन येण्यासाठी सतत त्रास दिला. या त्रासाला कंटाळून सोनालीने आत्महत्या केली.

दरम्यान, आडगाव पोलिस स्थानकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक (PI) इरफान शेख, सहाय्यक पोलिस निरीक्षक (API) शिंदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक (API) तोडकर यांनी घटनास्थळी जाऊन भेट दिली. या घटनेबाबत बुधवारी (दि. ८ जून) गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलिस निरीक्षक (API) शिंदे या घटनेचा अधिक तपास करत आहे.