अनैतिक संबंधातून उपनगर भागात प्राणघातक हल्ला

नाशिक : पत्नीसोबत असलेल्या अनैतिक संबंधांची माहिती झाल्याने, त्या रागातून पतीने पत्नीच्या प्रियकरावर प्राणघातक हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे. या संशयित आरोपीने आपल्या साथीदारांसह या व्यक्तीला गळ्यावर सुरा मारून गंभीर जखमी करून, ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, उपनगर पोलीस ठाणे (Upnagar Police Station) हद्दीतील ३० वर्ष वयाची व्यक्ती (रा. नारायण बापू नगर, टाकळी रोड, नाशिकरोड) यास दिनांक ३ जुलै रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास काही व्यक्तींनी गळ्यावर वार करून, गंभीर जखमी केले आहे. या जखमी व्यक्तीस स्थानिक लोकांनी प्रथम जिल्हा शासकीय रुग्णालय (Civil Hospital) व त्यानंतर पुढील उपचाराकरिता डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेज (Dr. Vasantrao Pawar medical college) येथे दाखल करण्यात आले.

आगर टाकळी गाव या घटनास्थळी आर. जे. ०९ एस. एक्स. ३९९२ या क्रमांकाची मोटर सायकल मिळून आली. त्यावरून माहिती घेतली असता, जखमी व्यक्तीच्या शेजारी राहणाऱ्या महिलेशी असलेल्या प्रेम संबंधांतून, तिच्या नवऱ्याने आपल्या साथीदारासह आगळ टाकळी गाव येथील उसाच्या शेताजवळ त्याच्या गळ्यावर सुरा मारून, त्यास गंभीर जखमी केल्याचे निष्पन्न झाले आहे.

पोलिसांनी त्वरित या घटनेचा तपास करत संशयित आरोपी, त्याचे साथीदार व त्या महिलेला ताब्यात घेत, त्यांची चौकशी करण्यात आली.
या जखमी व्यक्तीच्या भावाच्या फिर्यादीवरून भा.द.वि कलम ३०७ प्रमाणे उपनगर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही चालू आहे.
पोलिसांनी जखमी व्यक्तीस खाजगी रूग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी या जखमी व्यक्तीवर शस्रक्रिया केली आहे.