धक्कादायक: शहरात विनयभंगाच्या तीन घटना घडल्याची नोंद..

By चैतन्य गायकवाड |

नाशिक : नाशिक शहरात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. त्यात विनयभंग केल्याच्या घटना अधिक दिसत आहे. काल शहरात विनयभंगाच्या तीन घटना घडल्याची नोंद करण्यात आली आहे. ह्या घटना आडगाव, उपनगर आणि म्हसरूळ या परिसरातील आहेत. या प्रकरणी सबंधित फिर्यादी महिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार संबंधित पोलिस ठाण्यांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आडगाव परिसरातील घटना … आडगाव पोलिस स्थानकात (Adgaon Police Station) फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, एका संशयित आरोपीने फिर्यादी महिला यांच्या पतीला तुझ्यामुळे माझ्या नर्सरीचा रस्ता बंद झाला, असे म्हणून भांडणाची कुरापत काढली. तसेच फिर्यादी यांच्या नवऱ्याला शिवीगाळ करून मारण्यास सुरुवात केली. तसेच तक्रारदार महिला यांना देखील मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्या अंगाला हात लावण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. दरम्यान, या प्रकरणी आरोपीवर आडगाव पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक शिंदे (API Shinde) हे या घटनेचा अधिक तपास करत आहे.

उपनगर परिसरातील घटना … उपनगर पोलिस स्थानकात (Upnagar Police Station) फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, तक्रारदार महिला ही तिच्या नातेवाईकांसह व मतिमंद मावशीसह एकत्र राहते. दरम्यान, तक्रारदार महिला या कामानिमित्त घरातून बाहेर गेल्या, तेव्हा त्यांच्या मावशी घरात एकट्याच होत्या. या महिला घरी परत आल्यानंतर त्यांनी फ्लॅटची बेल वाजवली. मात्र, मावशीने उशिराने दरवाजा उघडला. त्यावेळी संशयित आरोपी हा आधीपासूनच फ्लॅटच्या गॅलरीत लपलेला होता. त्या संशयित आरोपीने फ्लॅटमध्ये प्रवेश करून मतिमंद मावशीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. दरम्यान, या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक गोळे (PSI Gole) हे या घटनेचा अधिक तपास करत आहे.

म्हसरूळ परिसरातील घटना … म्हसरूळ पोलिस स्थानकात (Mhasarul Police Station) फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, एका संशयित आरोपीने तक्रारदार महिला यांच्याबद्दल बदनामीकारक शब्द वापरले. तसेच त्यांच्याबद्दल अश्लील व्हिडिओ प्रसारित करून बदनामी केली. फिर्यादी यांच्या मुलाचा साखरपुडा मोडावा, या उद्देशाने आरोपीने फिर्यादी महिलेबद्दल बदनामीकारक मॅसेज व अश्लील व्हिडिओ प्रसारित करून महिलेची बदनामी केली. दरम्यान, या संशयित आरोपीविरोधात म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक साखरे (PI Sakhare) हे या घटनेचा अधिक तपास करत आहे.