‘त्या’ चायनीज विक्रेत्याच्या संशयास्पद मृत्यूचा उलगडा; ‘हे’ आहे कारण..

By चैतन्य गायकवाड |

नाशिक : शरणपूर पालिका बाजार येथील तिबेटियन मार्केट (tibetian market) परिसरात चायनीज पदार्थांची विक्री करून व्यवसाय करणारे कैलास बाबुराव साबळे (वय ४५, रा. हेडगेवार चौक, सिडको) यांचा रविवारी (दि. १२) राहत्या घरी संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान या संशयास्पद मृत्यूचा उलगडा करण्यात अंबड पोलिसांना (Ambad Police) यश आले आहे. घरगुती वादातून नवरा बायकोत भांडण झाल्याने पतीचा मृत्यू झाला आहे. या भांडणात नवरा बायकोत झटापट होऊन त्यात डोक्याला मार लागल्याने पतीचा मृत्यू झाल्याची बाब उघडकीस आली आहे.

याबाबत, अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कैलास बाबूराव साबळे (Kailas Baburao Sabale) यांच्या आकस्मिक मृत्यूची नोंद अंबड पोलिस स्थानकात करण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास केला असता शवविच्छेदन अहवाल, वैद्यकीय अधिकाऱ्यांचा शवविच्छेदनानंतर आलेला अभिप्राय तसेच साक्षीदारांचे जबाब या बाबत पोलिसांनी तपास केला. तपासानंतर समोर आलेल्या माहितीतून, नवरा बायकोच्या भांडणातून झटापट होऊन नवऱ्याच्या डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाल्याची बाब उघड झाली आहे. या पती-पत्नीतील सुरू असलेले भांडण वाढल्याने त्यात दोघांची झटापट झाली. याच झटापटीत पतीच्या डोक्याला मार लागून त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान कैलास बाबुराव साबळे आणि त्यांची पत्नी निशा साबळे या दोघांमध्ये नेहमी वाद होत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी पत्नीसह एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, कैलास साबळे हे तिबेटियन मार्केट येथे चायनीज खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय करत होते. त्यांचा राहत्या घरातच संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली होती. त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात (District civil hospital) दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील तपासास सुरुवात केली होती. पोलिसांच्या तपासातून कैलास साबळे यांच्या मृत्यूचे कारण समोर आले आहे.