By चैतन्य गायकवाड |
पंचवटी: नाशिक शहरातील (Nashik city) पंचवटी (Panchavati) परिसरात असलेल्या हनुमानवाडी (Hanumanwadi) भागात रात्रीच्या सुमारास काही अज्ञात समाज कंटकांनी चारचाकी वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. रात्रीच्या सुमारास अंधारचा फायदा घेत या समाज कंटकांनी तीन चारचाकी वाहनांची तोडफोड केली. दरम्यान, पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या किंवा घरासमोर असलेल्या वाहनांना असे लक्ष्य केले जात असल्याने नागरिक वाहन उभे करायला देखील घाबरत आहे. या तोडफोडीने वाहनांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
याबाबत आणखी माहिती अशी की, काही अज्ञात समाज कंटकांकडून घराच्या समोर उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. या वाहनांमध्ये एक जीप, पिकअप आणि कारचा समावेश आहे. दगडफेक करून या वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. यामुळे वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, वाहन मालकांना आर्थिक फटका बसला आहे. येथील स्थानिक नागरिकांनी या अज्ञात व्यक्तींना अटक करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. या वाहनांच्या मागच्या आणि पुढच्या काचा फोडण्यात आल्याची घटना घडली आहे.
दरम्यान, पंचवटी पोलिस (Panchavati Police) या घटनेप्रकरणी अधिक तपास करत आहे. या घटनेप्रकरणी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.