धक्कादायक… मानसिक रुग्णाचे हातपाय बांधून अघोरी पूजेचा प्रयत्न..

By चैतन्य गायकवाड ।

निफाड : निफाड तालुक्यातील धानोरे येथील एका मानसिक रुग्णाचे हातपाय दोरीने बांधून त्याची अघोरी पूजा करण्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. पिडीत हा मानसिक आजाराने त्रस्त असल्याने नातेवाईकांनी त्याला अनेक देवस्थानी ठेवले. इतकेच नव्हे तर त्याच्या पायात लोखंडी बेडी देखील घातली गेली. परंत, अनेक प्रयत्न करूनही इलाज काही येत नव्हता.

अश्यातच शिरवाडे (वाकद) येथील एका भगताने त्यांना अघोरी पूजा करण्यास सांगितली. त्यासाठी गोदावरी नदीत आंघोळ घालून अघोरी पूजा करण्यात येणार होती.मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास नातेवाईक व भगत मोर्विस येथे नदीकाठी यथे आले. नदीकाठी रहदारीपासून दूर अंतरावर एकांतात सर्व जमा झाले. तेथील गावकऱ्यांना हे सर्व प्रकरण संशयास्पद वाटल्याने ते तिथे गेले. त्यावेळी हा भयानक प्रकार समोर आला.

मोर्विसचे पोलीस पाटील सोमनाथ पारखे व गावकरी गोरख कोकाटे यांनी तत्काळ अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नाशिक येथील कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे यांना फोन करून या गंभीर घटनेची माहिती दिली. कृष्णा चांदगुडे यांनी हा जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा असल्याचे नातेवाईकांना सांगितले. या पिडीतास मानसिक आजार असल्याने, त्यास अशा अघोरी पूजा करण्यापेक्षा डाॅक्टरांची गरज असल्याचे सांगितले. त्यानंतर गावकऱ्यांनी पिडीतास दोरी बांधलेली असताना त्यातून मुक्त केले. त्यानंतर गावकऱ्यांनी स्थानिक पोलिसांना घटनेची माहिती दिली व संबधित भगतावर कारवाई करण्याची मागणी केली. गावकऱ्यांच्या जागरुकतेमुळे अघोरी प्रयत्न थांबला असल्याने त्यांचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे.

‘शरीर जसे आजारी पडते, तसे मनही आजारी पडू शकते. त्यामुळे रुग्णास साखळदंड, बेडी अथवा दोरीने बांधून देवस्थानी ठेवत अघोरी कृत्य करणे योग्य नाही. तर त्यास मानसोपचार तज्ञाची गरज असते. अशा घटनांत अंनिसकडून समुपदेशन केले जाते. अशा रुग्णाच्या नातेवाईकांनी अंनिसशी संपर्क साधावा’- कृष्णा चांदगुडे, राज्य कार्यवाह, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती.