नाशिक । प्रतिनिधी
इगतपुरी तालुक्यातील मालूंजे येथील एका दापंत्यावर वीज पडून जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी सायंकाळी घडली. लग्नासाठी पिंपळगाव घाडगा येथे आले असताना ही दुर्देवी घटना घडली. दशरथ दामू लोते (३५), सुनीता दशरथ लोते (३०) असे या पती पत्नीचे नाव आहे.
बुधवारी जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. इगतपुरी तालुक्यातील काही भागात पाऊस कोसळला. मात्र येथील मालुंजे येथील दाम्पत्य लग्न आटोपल्यानंतर घरी परतत असताना काळाने घाला घातला. अचानक बेमोसमी आणि जोरदार वादळी पाऊस विजेच्या कडकडाटासह सुरु झाल्याने या पती पत्नीने पावसाच्या भीतीने आंब्याच्या झाडाखाली आश्रय घेतला. मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होत. झाडाखाली लपले असताना अचानक त्यांच्यावर वीज कोसळली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होते आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी तातडीने पुढील कार्यवाही सुरू केली. वाडीवऱ्हेचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल पवार यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी तपास कार्य व पंचनामा करत पुढील तपास सुरू करण्यास सुरुवात केली.
तर या पती पत्नीसोबत या झाडाखाली त्यांच्या दोन मुलीसह एक युवक गंभीर जखमी झाले आहेत.तेजस्विनी लोते (०७), सोनाली लोते (०५) ह्या दोघींसह गिऱ्हेवाडी येथील आणखी एक युवक बाळू चंदर गिऱ्हे (२०) हे तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर धामणगांव येथील एसएमबीटी रुग्णालयात उपचार सुरू केले आहेत. ही घटना बुधवारी दुपारी ४ ते ५ च्या सुमाराला घडली.