नाशिक । प्रतिनिधी
अति पावसाचे असो की अवकाळी पाऊस अनेकदा शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक सर्वच संकटांना सामोरे जात असताना अनैसर्गिक संकटानीही आता बळीराजाला खाईत लोटण्याचा प्रकार सुरू केला आहे. अनेकदा कोरडा दुष्काळ असतो तर कधी ओल्या दुष्काळामुळे हातच्या पिकांवर पाणी फेरले जाते. अशातच आता महाराष्ट्र सरकारने लोडशेडिंग केल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. या संकटाला तोंड असताना ठाणगाव येथील शेतकऱ्याने उभ्या कांदा पिकाला आग लावल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
येवला तालुक्यातील ठाणगाव येथील शेतकऱ्याने हे टोकाचे पाऊल उचलले असून पाण्याअभावी वाळत चालत चालेल्या उन्हाळ कांद्याला या शेतकऱ्याने आग लावली आहे. विशेष म्हणजे सध्या विहरीला पाणी भरपूर आहे मात्र लोडशेडिंग सुरु असल्याने पिकाला पाणीच भरता येत नसल्याने शेतकऱ्यावर हि वेळ आली आहे.
ठाणगाव येथील सागर शेळके व त्यांच्या भावाला एकूण चार एकर शेती असून त्यातील दीड एकर शेतीमध्ये जानेवारी महिन्याच्या अखेरीस त्यांनी उन्हाळ कांद्याची लागवड केली होती. लागवडीसह खतांवर सव्वा लाख रुपयांचा खर्च करण्यात आला होता. कांद्याचे उत्पादन चांगले यावे यासाठी त्यांनी आतापर्यंत दहा ते बारा वेळेस खांद्यांवर औषधांची फवारणी केली होती. मात्र महिनाभरापासून ठाणगाव परिसरात केवळ एकच तास तेही रात्री वीज पुरवठा होत असल्याने कांदा पिकाला पाणी देता येत नसल्याची खंत सागर शेळके यांनी व्यक्त केली.
विहिरीला पाणी आहे, पण वीज नाही त्यामुळे हातचे पीक डोळ्यादेखत वाळल्याने आग लावायची वेळ त्यांच्यावर आली. एकीकडे उन्हाचा तडाखा वाढल्याने तसेच वेळेवर पाणी देता न आल्याने कांद्याची वाढ झाली नाही. त्यातच कडक उन्हामुळे पीक वाळू लागल्याने मोठ्या कष्टाने घेतलेल्या पिकाला आग लावताना शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले.
गेल्या काही दिवसांपूर्वी पालखेड डावा कालवाला पाणी येऊनही खंडित वीज पुरवठ्यामुळे कांदा पिकाला पाणी देता आले नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. कांदा पिकाची राखरांगोळी केल्यानंतर त्यांनी जळालेल्या पिकांवर नांगरे फिरवला. सध्या तालुक्यात सर्वत्र कडक उन्हामुळे कांदा पिकाची हीच परत परिस्थिती दिसून येत असल्याने शेतकरी शेतकरी चिंताग्रस्त आहेत.