कौतुकास्पद! पिंपळगावचे पाचशे पुरातन वृक्ष दिसणार गुगल मॅपवर

नाशिक । प्रतिनिधी
माझी वसुंधरा अभियान अंतर्गत “हेरीटेज ट्री” (पुरातन वृक्ष) गणना पूर्ण करून ती गुगल मॅप्स वर प्रकाशित करणारी पिंपळगाव बसवंत ही राज्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.

नाशिकच्या निफाड तालुक्यातील ४१,५५९ लोकसंख्या असलेली पिंपळगाव बसवंत ही ग्रामपंचायत असून त्यांनी “हेरीटेज ट्री” (पुरातन वृक्ष) गणना पूर्ण केली आहे. गावाच्या एकुण क्षेत्रफळात १६,५०० वृक्षांचा समावेश असून त्यापैकी ४८० वृक्ष हे पुरातन “हेरीटेज ट्री” (पुरातन वृक्ष) आढळून आले आहेत.
तसेच ही वृक्ष गणना पूर्ण करून गुगल मॅप्स वर प्रकाशित करण्यात आली आहे. सदर गणना गुगल मॅप्स वर प्रकाशित करणारी पिंपळगाव बसवंत ही राज्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून माझी वसुंधरा अभियान सुरु आहे. यामध्ये जिल्ह्यातील सर्वच नगरपालिका, नगरपरिषद यांनी सहभाग नोंदविला होता. या मोहिमेच्या अंर्तगत शहरातील किंवा नगरपालिका हद्दीतील पुरातन वृक्षांचे संवर्धन करणे होय.

यामध्ये वृक्षाला टॅगिंग करणे, त्यांची नोंद करणे अशा पद्धतीने परिसरातील हेरिटेज ट्रीज संख्या कार्यान्वित करणे. अशा या मोहिमेत राज्यभरातून पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायत प्रथम आली आहे.