नाशिक । प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या(Nashik ZP) मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक श्रीमती लीना बनसोड (ZP CEO Leena Bansod) यांनी ग्रामपंचायत कोटंबी (Kotambi Grampnachayat) (ह), ता. त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) येथील ग्रामसेवक पांडुरंग जाणु खरपडे यांना १० दोषारोपावरुन व ग्रामपंचायत कोमलवाडी, ता. सिन्नर (Sinnar) येथील ग्रामसेवक राजेंद्र भाऊराव निकम यांना 03 दोषारोपावरुन निलंबित केले आहे.
पांडुरंग जाणु खरपडे हे ग्रामपंचायत कोटंबी (ह), ता. त्र्यंबकेश्वर येथे कार्यरत असुन त्यांच्याविरुध्द कार्यालयीन कामकाजाबाबत ग्रामस्थांनी लेखी तक्रार अर्ज सादर केलेले होते. त्यानुसार आर. आर. बोडके प्रशासक यांनी भेट दिली असता खरपडे हे गैरहजर असल्याचे आढळून आले. तसेच खरपडे वारंवार अनधिकृत गैरहजर असल्यामुळे ग्रामस्थांना शासकीय दाखले वेळेत न मिळणे, ग्रामस्थांना पाणी न मिळणे, कोटंबी हे गांव आदिवासी क्षेत्रात येत असुन पेसा व इतर आदिवासी योजनांपासुन गावास वंचित ठेवणे, ग्रामसभा न घेणे, पाणी शुध्दीकरणासाठी टीसीएल पावडर संपल्यानंतर नवीन साठा उपलब्ध करुन न देणे, गावांत 3 विहिरी असुन त्यापैकी कोटंबी येथील एक विहिरीवर विद्युत कनेक्शन नाही.
बोरपाडा व बेहेडपाडा या दोन विहिरीवर विद्युत कनेक्शन नियमित करण्यासाठी कोटेशन भरणेबाबत वारंवार सुचना देवूनही त्या कामाकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे बोरपाडा व बेहेडपाणी येथील ग्रामस्थांना विहरीवर पाणी ओढुन न्यावे लागते. यास खरपडे हे जबाबदार आहेत, तसेच खरपडे यांनी ग्रामपंचायतीचे दप्तर तपासणीसाठी उपलब्ध करुन न देणे, घरपट्टी, पाणीपट्टी वसुली न करणे.
तसेच १५ व्या वित्त आयोगाचे अनुदान प्राप्त असतांना खर्च केलेला नाही, व खरपडे हे अनधिकृत गैरहजर असल्याने जिल्हा परिषदा नियमांचा भंग आणि शासकिय कर्तव्यात कसुर केल्यामुळे गट विकास अधिकारी, त्रंबकेश्वर यांनी चौकशी करुन अहवाल सादर केल्यानंतर त्यांना (दि.१३) रोजीच्या आदेशानुसार शासकिय सेवेतून निलंबित करण्यात आलेले आहे.
तसेच राजेंद्र भाऊराव निकम हे ग्रामपंचायत कोमलवाडी ता. सिन्नर येथे कार्यरत असुन गट विकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांनी कोव्हीड १९ व विकास कामांचा आढावा घेणेसाठी ग्रामपंचायतीस भेट दिली असता निकम हे अनधिकृत गैरहजर होते. त्यामुळे विकास कामांचा व कोव्हीड १९ रुग्णाबाबतचा आढावा घेता आला नाही. याबाबत निकम यांना कारणे दाखवा नोटीस दिली असता कोणताही समाधानकारक लेखी खुलासा सादर केलेला नाही. निकम हे अनधिकृत गैरहजर असल्याने जिल्हा परिषदा नियमांचा भंग आहे.
तसेच विस्तार अधिकारी (ग्रा.पं) यांनी कोमलवाडी ग्रामपंचायतीचे दप्तर तपासणी केली असता ग्रामपंचायतीकडील नोंदवह्या नमुना नंबर ०१ ते ३३ या अपुर्ण अवस्थेत असल्याचे आढळले आहे. तसेच निकम यांच्या कामकाजाबाबत सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ यांनी तक्रार केली असुन त्यांचे कामकाज असमाधानकारक असुन त्याचा परिणाम हा ग्रामपंचायतीच्या विकास कामावर व प्रशासनावर होत असल्याने त्यांची अन्यत्र बदली अन्य ग्रामसेवकांची नियुक्ती करावी अशी मागणी केलेली होती, यावर कार्यवाही करत निकम यांना (दि.२०) रोजीच्या आदेशानुसार निलंबित करण्यात आलेले आहे.
दोन्ही ग्रामसेवकांना त्यांचे कार्यालयीन कामकाज यात सुधारणा व्हावी व गावांचा विकास करावा याबाबत संधी देवुनही त्यात सुधारणा न झाल्याने शेवटचा पर्याय म्हणून त्यांना शासकिय सेवेतून निलंबित करण्यात आलेले आहे, अशी माहिती ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) रवींद्र परदेशी यांनी दिली.