नाशिक । प्रतिनिधी
नदीत पोहण्यासाठी गेलेल्या मामा भाच्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बागलाण तालुक्यातील डांगसौंदाणे येथे घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
गणेश रामचंद्र जगताप (३२) व रोशन देवेंद्र बागुल (१८) अशी मयत झालेल्या मामा भाच्याची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार सध्या केळझर गोपाळ सागर धरणातून पाण्याचे तिसरे आवर्तन सोडण्यात आले आहे. त्यामुळे आरम नदीचे पात्र ऐन उन्हाळ्यात दुथडी भरून वाहत आहे. या नदीवरील दहिंदुले जवळील सिमेंट बंधाऱ्यावर चाफ्याचे पाडे (देवपूर) येथील हे दोन्ही मामा-भाचे आपल्या घरातील महिलासोबत कपडे धुण्यासाठी गेले होते.
दरम्यान घरातील महिला कपडे धूत असताना हे दोघे अंघोळीसाठी पाण्यात उतरले. मात्र त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दुपारी दोन वाजेच्या दरम्यान दहिंदुले गावाजवळील बंधाऱ्याजवळ मामा गणेश जगताप यांचा मृतदेह स्थानिकांना पाण्यात दिसून आला तर सायंकाळी उशिरा रोशन बागुल यांचा मृतदेह याच बंधाऱ्याच्या पाण्यात स्थानिकांना सापडला.
याबाबत सटाणा पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून या घटनेने चाफ्याच्या पाडा या गावावर शोककळा पसरली असून या दुर्दैवी घटनेची परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
दोघेही मामा भाचे स्वाध्याय परिवारातील असल्याने सर्वच गाव शोकसागरात बुडालेले आहे. रात्री उशिरा त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले या दुर्दैवी घटनेतील भाचा रोशन बागुल याने नुकतीच १२ वी ची परीक्षा दिली होती. पुढील तपास सटाणा पोलीस निरीक्षक सुहास अनमोल वार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जगन्नाथ लव्हारे, पोलीस हवालदार जयंतसिंग सोळकी, पोलीस नाईक निवृत्ती भोये अधिक तपास करत आहेत.