By Pranita Borse
नाशिक: सध्या नाशिक जिल्हा (Nashik district) पावसाने झोडपून काढलं आहे. तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे संपूर्ण जिल्हा जलमय झाला आहे. अशात ११ ते १४ जुलै दरम्यान नाशकात अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवल्यामुळे नाशिक जिल्ह्याला रेड अलर्ट Red alert to Nashik) देण्यात आला आहे.
नाशिक जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले आहे. गेल्या तीन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात सुरू असलेल्या दमदार सरींनी नाशिक जिल्ह्यात आणि शहरात पाण्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील ४ धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाण्याचा प्रवाह कायम आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्यात पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येत आहे. जिल्ह्यात वरूण राजाचं जोरदार आगमनामुळे पाणीपातळीत वाढ होत आहे. पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे अनेक धरण ५० टक्केच्यावर भरल्याने पाण्याचा विसर्ग देखील सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागात अनेक ठिकाणी नद्यांवरील पुल पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अशात ११ ते १४ जुलै दरम्यान अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत असल्यामुळे नाशिक जिल्ह्याला रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.
शहर जलमय; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना
संततधार पावसामुळे गंगापूर धरण जवळपास ६० ते ६५ टक्के भरले आहे. सकाळपासून धरणातून टप्प्याटप्प्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग गोदावरी पात्रात करण्यात येत आहे. गोदावरी नदी देखील दुथडी भरून वाहत आहे. टप्प्याटप्प्याने हा पाण्याचा विसर्ग वाढवत आता दहा हजार क्युसेक इतक्या वेगाने पाणी गंगापूर धरणातून गोदावरी नदीमध्ये सोडण्यात आलं आहे. त्यामुळे गोदावरी नदीत पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. रामकुंड परिसरात असलेले अनेक मंदिरात पाण्याखाली गेले आहेत. तसेच गोदावरी नदीची पाणीपातळी वाढल्याने या परिसरात राहणाऱ्या लोकांना देखील सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. नदीकाठच्या दुकान आणि घरांना खाली करण्याचे देखील आदेश प्रशासनाने दिलेले आहेत. या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी नाशिक मनपाचे आयुक्त रमेश पवार यांनी काही अधिकाऱ्यांसह या भागाची पाहणी केली तसेच गोदावरी नदीला पूर आला तर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मनपा प्रशासन देखील ॲक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळतेय.