‘त्या’ ऑडिओ क्लिपसह अन्य प्रश्नांची उत्तरे मिळतील!

नाशिक । प्रतिनिधी

नाशिकचे माजी नगरसेवक सलीम मामा शेख हे काही चर्चेत आहेत. भोंग्याच्या निर्णयावरून नाशिकमध्ये चांगलाच वाद रंगला होता. दरम्यान सलीम शेख आपल्या भाषणातून विरोधकांची बोलती बंद करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

ठाणे येथील डॉ. मूस मार्गावर मनसेची उत्तरसभा आयोजित करण्यात आली आहे. हि सभा आज सायंकाळी पार पडत या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोड धडाडणार आहे. तत्पूर्वी काही दिवसांपूर्वी चर्चेत आलेले सलीम मामा शेख देखील आपल्या भाषणातून काही प्रश्नांची उत्तरे देणार आहेत. गुढी पाडव्याच्या दिवशी राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर केलेल्या वक्तव्यानंतर सलीम शेख यांनी पाठिंबा दर्शवला होता. यावरून शेख यांच्या मुस्लिम बांधवांकडून जोरदार टीकाही करण्यात आली होती.

दरम्यान याच पार्श्वभूमीवर सलीम मामा शेख आज या सभेतून झालेल्या घटने संदर्भात उत्तर देणार असल्याचे त्यांनी सांगितले, शेख यांनी या सभेच्या पार्श्वभूमीवर आज माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. ते यावेळी म्हणाले कि, ‘राज साहेबांनी आज मला सभेत भाषण करण्याचे आदेश दिले आहेत. मधल्या काळात माझ्यावर खूप आरोप झाले, मात्र माझं भाषण पूर्ण न ऐकता, राजकीय विरोधकांनी त्याचा विपर्यास केला, आज ठाण्यातील सभेतून माझ्यावर झालेल्या घटनेला मी उत्तर देणार आहे.

तसेच व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप प्रकरणावर ते म्हणाले कि, ‘राजकारणाच्या उद्देशाने काहींनी माझी भूमिका चुकीच्या पद्धतीने व्हायरल केली, तसेच मी पक्ष सोडणार या सगळ्या अफवा असून मी शेवट पर्यंत राज ठाकरे यांच्या सोबत असणार आहे. त्यामुळे आजच्या राज साहेबांच्या सभेतून सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील असेही सूतोवाच त्यांनी यावेळी केले.

दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज ठाण्यात सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेची जोरदार तयारी ठाण्यातील मनसे कार्यकर्त्यांनी सुरू केली आहे. सुमारे ४० हजारहून अधिकचा जनसमुदाय या सभेसाठी उपस्थित राहण्याची शक्यता मनसेकडून वर्तविली जात आहे.