धक्कादायक! नाशिक जिल्हा रुग्णालयात आढळल्या बोगस महिला डॉक्टर

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक जिल्हा रुग्णालयात तीन बोगस महिला डॉक्टर आढळल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. जिल्हा रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागात तीन बोगस महिला डॉक्टर आढळल्यानं एकच खळबळ उडाली.

जिल्हा रुग्णालयातील ओपीडी बिल्डींग मध्ये तीन महिला हातात स्टेथिस्कोप घेऊन संशयित रित्या फिरत असताना दिसून आल्या होत्या. या महिला डॉक्टर बाह्य रुग्ण विभागात फिरत असताना इंचार्ज सिस्टरला त्यांच्यावर संशय आल्याने या इंचार्ज सिस्टरने विचारणा केली असता या तिन्ही बोगस महिला डॉक्टरांनी उडवाउडवीची उत्तर दिली. त्यानंतर त्यांची चौकशी केली असता या बोगस डॉक्टर असल्याचे निदर्शनास आले.

या तिन्ही महिला डॉक्टर बोगस असल्याचे लक्षात येताच रुग्णालय प्रशासनाने त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र, या तिन्ही बोगस महिला डॉक्टर जिल्हा रुग्णालयात का फिरत होत्या, याचा तपास सरकारवाडा पोलीस करत आहेत.