नाशिक । प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर शहरातील वसंतोत्सवास उत्साहात सुरवात झाली असून आजचा तिसरा दिवस आहे. त्यामुळे मागील दोन दिवसांच्या बॊहाड्याने चांगलीच रंगत आणली आहे.
त्र्यंबकेश्वर येथील महामृत्युंजय प्रतिष्ठानचे संस्थापक मंगेश धारणे व सामाजिक कार्यकर्ते सनी उगले यांच्या कल्पकतेतून वसंतोत्सवानिमित्त बोहाडा याचे तीन दिवसाचे आयोजन करण्यात आले. कुशावर्त चौकात विविध पौराणिक पात्रे युवकांनी घेऊन सायंकाळी सात वाजता कुशावर्त चौकात आरती करुन सोंगे काढण्यात आली. सगळ्यात प्रथम डोळे नाचवित आणण्यात आले. यात आंब्याची डोळे शरीरावर बांधुन सवाद्य मिरवण्यात आली.
या वेळी गणपती, शारदा, लहरी राजा, कच्छमच्छ, चारण, श्रीकृष्ण व गोपी, होडी चालक व कोळी, रावण व राम लक्ष्मण युद्ध, भैरव व राक्षस, खेकडे, मोहिनी भस्मासुर युध्द असे विविध पात्र साकारण्यात आले होते. आज शेवटचा दिवस असून दोन दिवसांपासून सुरु असलेल्या या बोहाडा नाट्यात नागरिकांचा उत्साह द्विगुणित झाला आहे.
बोहाडा म्हणजे मुखवटानाट्य. तीन दिवसांचा ‘लहान्या’ आणि सात दिवसांचे ‘मोठाले’ बोहाडे असतात. त्यात काही नवसाचेसुद्धा असतात. बोहाडा सुरू होण्यापूर्वी गावदेवतेचा मुहूर्त साधून देवी-देवतांची मिरवणूक काढण्यात येते. त्याला ‘मोहाटी’ असे म्हणतात. हाताची पाचही बोटे रंगात बुडवून पंजासकट त्याचा ठसा देवळाच्या भिंतीवर उमटवला जातो. या थापेने बोहाड्याची सुरुवात होते.