क्रेडाई प्रॉपर्टी एक्सपो : ३८० सदनिकांच्या बुकिंगसह होणार ६०० कोटींची उलाढाल

नाशिक । प्रतिनिधी

तब्बल दोन वर्षानंतर आयोजित क्रेडाई नाशिक मेट्रो प्रोपर्टी एक्सपो या गृहपर्वणी प्रदर्शनास नाशिक सहित जळगाव, धुळे, अहमदनगर, ठाणे, मुंबई व पुणे येथील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. यामुळे नाशिकची बांधकाम व्यावसायिकत्याचे स्वरूप बदलते आहे, याची प्रचिती या प्रदर्शनाच्या माध्यमातून आली आहे.

दरम्यान या चार दिवशीय प्रदर्शनाला मिळालेल्या प्रतिसादामुळे शहरात येत्या १५ ते २० दिवसात सुमारे दोन हजार सदनिकांचे बुकिंग होणार असून सुमारे ६०० कोटींची उलाढाल नाशिक शहरात होणार असल्याची माहिती क्रेडाई नाशिक मेट्रो चे अध्यक्ष रवी महाजन यांनी दिली. प्रदर्शन कालावधीत सुमारे ३८० सदनिकांचे स्पोट बुकिंग देखील झाले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नाशिक येथील डोंगरे वस्तीगृहावर १४ एप्रिल ते १७ एप्रिल असे चार दिवसीय प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनाला सुमारे ४० हजार नागरिकांनी भेट दिली. रविवारी संध्याकाळी या प्रदर्शनाचा समारोप खासदार हेमंत गोडसे यांच्या उपस्थितीत झाला. अशा प्रकारच्या एक्पोच्या आयोजनासाठी क्रेडाई नाशिक मेट्रोचे गोडसे यांनी अभिनंदन केले. शहराच्या वाढलेल्या कनेक्टिविटी मुळे अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. कनेक्टिविटी वाढल्यास अनेक संधी नाशिकला मिळतील त्यांनी सर्व शहराला लाभ होईल असे त्यांनी नमूद केले.

नाशिकमध्ये बांधकाम व्यवसायाला अच्छे दिन आले असून बांधकाम उद्योगावर इतर अनेक उद्योग व्यवसाय अवलंबून असतात. तसेच अनेक कुशल व अकुशल कामगारांना मोठ्या प्रमाणात रोजगार देखील बांधकाम उद्योगामुळे मिळतो. यासोबत शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल देखील प्राप्त होतो. प्रॉपर्टी एक्सपोला मिळालेला प्रतिसाद परिणामस्वरूप येत्या काही दिवसात नाशिकचे एकूण अर्थकारण देखील बदललेले पाहायला मिळणार आहे. त्यामुळे क्रेडाई प्रॉपर्टी एक्स्पोला नाशिककरांनी दिलेला प्रतिसाद नक्कीच बांधकाम व्यवसायाला दिशा देणारा ठरणार असल्याचे मत अध्यक्ष रवी महाजन यांनी सांगितले.