मुंबई । प्रतिनिधी
एकीकडे महागाई वाढली असतानाच गॅस सिलेंडर मधून गॅसची चोरी करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिक तालुक्यातील गिरणारे येथील हा प्रकार असून सिलेंडर डिलेव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून हा प्रकार उघडकीस आला आहे.
गिरणारे येथील मोती पुष्प या गॅस सिलेंडर डिलेव्हरी करणाऱ्या एजन्सी चा हा कर्मचारी आहे. गिरणारे सह परिसरात मोती पुष्पच्या माध्यमातून गॅस सिलेंडर डिलेव्हरी केली जाते. अशातच सध्या गॅस सिलेंडरचे भाव गगनाला भिडले आहेत. त्याबरोबर इतर जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढले असताना अशा प्रकारे गॅसची चोरी करण्यात येत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
सदर मोती पुष्प एजन्सीची गॅस डिलेव्हरी ची व्हॅन दुगाव मानोली परिसरात गॅस वितरित करत असताना हा प्रकार समोर आला आहे. येथील ग्रामस्थांनी गॅस सिलेंडर स्वीकारताना वजन करण्यास सांगितले. यावेळी कर्मचाऱ्याने व सोबत असलेल्या एजन्सीच्या कर्मचाऱ्याने टाळाटाळ केली. यावरून ग्रामस्थांनी सदर गॅस सिलेंडरचे वजन करण्यास सांगितले. मात्र यावेळी देखील त्यांनी टाळाटाळ करीत उडवाउडवीची उत्तरे दिली.
यानंतर ग्रामस्थानीच सदर सिलेंडरचे वजन केले. त्यावेळी वजन कमी असल्याचे निदर्शनास आले. यावरून ग्रामस्थांनी जाब विचारला असता कर्मचाऱ्यांनी वाद निर्माण केला. या संबंधीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एजन्सीचे धाबे दणाणले आहेत. सदर ग्रामस्थांनी एकत्र येत एजन्सी विरुद्ध आवाज उठवत या प्रकाराचा खुलासा करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.
अशी करा तपासणी
गॅस सिलेंडरची डिलेव्हरी देणार्या कर्मचाऱ्यांकडे असलेल्या वजनकाट्यावर तुम्ही सिलेंडरचे वजन करू शकता. घरगुती सिलिंडरमध्ये १४.२ किलो गॅस असतो. याशिवाय रिक्त सिलिंडरचे वजन वेगळे आहे. त्याची माहिती तुम्हांला सिलेंडरवर लिहलेली दिसेल. घरगुती रिक्त सिलिंडरचे वजन १५.३ किलो आहे. अशा परिस्थितीत सिलिंडर घेताना १४. २ किलो एलपीजी गॅस आणि १५. ३ किलो रिकाम्या सिलिंडरच्या वजनाने सिलिंडर तपासा.याशिवाय सिलेंडर वर असलेले प्लॅस्टिकचे आवरण पूर्ण सीलबंद आहे की नाही हे तपासा. जर ते अर्धवट असेल तर त्या सिलेंडर सोबत छेडछाड झालेली असू शकते.