नाशिक | प्रतिनिधी
नाशिक तालुक्यातील गिरणारे येथील मरिआई मंदिराजवळ राहणाऱ्या कुटुंबातील लहान मुलीवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे.
सदर घटनेत मुलगी गंभीर झाली आहे. अधिक माहिती अशी की गिरणारे येथील मरी आई मंदीराजवळ त्र्यंबक तालुक्यातील रमेश शंकर पागी हे कुटुंब राहत होते.
दरम्यान आज पहाटेच्या सुमारास हे कुटुंब मोकळ्या जागेत झोपलेले असताना अचानक बिबट्याने लहान मुलीवर झडप घातली. यानंतर तिच्या मानेला पकडून जंगलात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र कुटुंबिय व स्थानिक नागरिकांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी आरडाओरडा केला.
बिबट्याने आरडाओरडा ऐकताच मुलीला सोडून पळ काढला. बिबट्याने मुलीच्या मानेवर व पोटावर जखमा केल्याचे आढळून आले. यावेळी मुलीच्या कुटुंबीयांनी तात्काळ तीस नाशिक येथे जिल्हा रुग्णालयात दाखल केले. सध्या तिच्यावर उपचार सुरू असून तिची प्रकृती सुधारत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.