नाशिककर! टाकी भरून ठेवा शहरात शनिवारी ‘नो पेट्रोल’

नाशिक | प्रतिनिधी

शहर पोलीस आयुक्तांनी हेल्मेट सक्तीसाठी पेट्रोल पंपा संदर्भात एकतर्फी निर्णय घेतल्याचा आरोप करीत शहरातील सर्व पेट्रोल पंप चालकांनी गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे शनिवारी पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान पोलीस आयुक्त यांनी ‘नो हेल्मेट नो पेट्रोल’ विषयी नवीन आदेश प्रसिद्ध केल्यानंतर पेट्रोल पंप चालकांनी आक्रमक भूमिका घेत शहरातील पेट्रोल व डिझेलची विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष भूषण भोसले यांनी दिली आहे.

दरम्यान या संदर्भात गुरुवारी सकाळी पालकमंत्री भुजबळ यांची पेट्रोल-डिझेल असोसिएशनचे पदाधिकारी भेट घेणार आहेत. शहरात वाहन चालवताना दुचाकी चालक आणि हेल्मेट वापरले पाहिजे यासाठी पेट्रोल पंप चालकांचाही आग्रह असल्याचे नमूद करतानाच या सर्व मोहिमेला व्यावसायिकांचा नेहमीच पाठिंबा राहिल आहे. मात्र पोलिसांनी आता घेतलेली भूमिका आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करणे, या दोन गोष्टी अतिशय धक्कादायक असल्याचे मत संघटनेतर्फे व्यक्त करण्यात आले आहे.

तसेच पेट्रोल पंपावर हेल्मेट घातलेले व्यक्ती रस्त्यावर वाहन चालवताना हेल्मेट काढून ठेवत असल्याचेही पेट्रोल चालकांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे. संघटनेतर्फे स्पष्ट करताना या निर्णयाविरुद्ध पालकमंत्र्यांकडे दाद मागणार असल्याचे नमूद करतानाच नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्व पेट्रोल पंप चालक एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारून कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे संघटनेचे अध्यक्ष भूषण भोसले माजी अध्यक्ष विजय ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

काय आहे नेमका पोलीस आयुक्तांचा आदेश

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शहर पोलीस आयुक्तांना आयुक्तालयाकडून शहरात हेल्मेट सक्ती ची मोहीम अत्यंत कठोर पद्धतीने राबवली जाणार आहे. त्याच्या सोबत असलेल्या सह प्रवाशाला देखील हेल्मेटचा वापर बंधनकारक राहणार आहे. अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल. तसेच विना हेल्मेट दुचाकी चालकांना पेट्रोल दिल्यास पेट्रोल पंप चालत मालकांवर थेट आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात येईल.